I.N.D.I.A Seat Sharing: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी (24 जानेवारी) राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली. यामुळे काँग्रेस आणि विरोधी आघाडी 'India'ला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, गुरुवारी (25 जानेवारी) तृणमूलने पश्चिम बंगालमध्ये स्वबळाच्या निर्णयाचे कारण सांगितले.
तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि टीएमसीमध्ये युती न होण्याचे खापर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांच्यावर फोडले. ओब्रायन म्हणाले, 'बंगालमध्ये युतीचे काम न होण्यामागे तीन कारणे आहेत. अधीर रंजन चौधरी, अधीर रंजन चौधरी आणि अधीर रंजन चौधरी. इंडिया आघाडीचे अनेक टीकाकार होते, परंतु भाजप आणि अधीर रंजन चौधरी यांनी आघाडीविरोधात वारंवार विधाने केली.'
डेरेक ओब्रायन पुढे म्हणाले, 'गेल्या दोन वर्षांपासून अधीर रंजन चौधरी भाजपची भाषा बोलत आहेत. बंगाल केंद्रीय निधीपासून वंचित असल्याचा मुद्दा त्यांनी एकदाही उपस्थित केला नाही. ईडीने बंगालमध्ये टीएमसीवर कारवाई केली, तेव्हा त्यांनीही त्याला पाठिंबा दिला होता', असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, टीएमसी आणि काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्यात विविध मुद्द्यांवरुन अनेकदा वाद झाले आहेत. अलीकडेच टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, जर आम्हाला आघाडीत योग्य महत्त्व दिले नाही, तर आम्ही बंगालच्या सर्व 42 जागांवर निवडणूक लढवू. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले होते की, आघाडीत लहानसहान गोष्टीत होत राहतात, मात्र आम्ही यावर तोदगा काढू. ममतांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश बुधवारी म्हणाले होते, ममता बॅनर्जींशिवाय 'इंडिया' आघाडीची कुणी कल्पना करू शकत नाही.