नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी आज (शुक्रवार) राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान राजीनामा देण्याची घोषणा केली. ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. (tmc rajya sabha member dinesh trivedi announces resignation during debate on budget)
राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत तृणमूल काँग्रेसचे सदस्य खासदार दिनेश त्रिवेदी यांनी सहभाग घेतला. दिनेश त्रिवेदी यांना बोलण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत अचानक राजीनामा देत असल्याची घोषणा केली. दिनेश त्रिवेदी लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
काय म्हणाले दिनेश त्रिवेदी?
वास्तविक पाहता जन्मभूमीसाठी आम्ही काम करत आहोत. आता सहन होत नाही. पक्षात अनेक मर्यादा येत आहेत. नेमके काय करावे हेच सूचत नाही. माझी आता घुसमट होतेय. तेथे अत्याचार होताना दिसत आहेत. मात्र, आम्ही काहीही करू शकत नाही. आता बंगाली जनतेमध्ये जावे, हा अंतरात्म्याचा आवाज आहे. त्यामुळे या क्षणी येथे चर्चेला उभा असताना राजीनामा देत आहे. देशासाठी आणि बंगलाच्या जनतेसाठी नेहमी पुढाकार घेऊन काम केले आहे आणि यापुढेही करत राहीन, असे त्रिवेदी यांनी राज्यसभेत बोलताना सांगितले.
श्रीमान शाहा तुमच्या मुलाचं काय? ममता बॅनर्जींचा अमित शाहांना बोचरा सवाल
भाजपमध्ये प्रवेशाची दाट शक्यता
गेल्या अनेक दिवसांपासून दिनेश त्रिवेदी तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील, असा कयास होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश त्रिवेदी लवकरच तृणमूल काँग्रेसमधून राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. दिनेश त्रिवेदी यांनी भर राज्यसभेत बोलताना केलेली राजीनाम्याची घोषणा ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी शुभेंदू अधिकारी, मुकुल घोष, राजीव बॅनर्जी यांसारख्या बड्या नेत्यांनी तृणमूल काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.