नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेससाठी चार ते पाच जागा सोडण्याची तयारी दर्शविली आहे. ‘इंडिया’ आघाडीत तसेच पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसशी सलगी करणाऱ्या माकपला धडा शिकविण्याचाही त्यामागे उद्देश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. काँग्रेस-तृणमूल काँग्रेस यांच्यात जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्यास ‘इंडिया’ आघाडीत माकपची चांगलीच पंचाईत होणार असून, काँग्रेस-माकप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या ठिणग्या उडण्याची चिन्हे आहेत.
केरळमध्ये काँग्रेसविरोधात आक्रमकपणे लढणारा माकप एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला हाताशी धरून ममता बनर्जींना शह देण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस-माकपने एकत्र लढल्या आहेत. पण, यंदा माकपला दूर ठेवण्याच्या अटीवर काँग्रेसशी हातमिळवणी करण्याची तयारी दाखवून ममता बॅनर्जी कुरघोडीसाठी सज्ज झाल्या आहेत. जागावाटपाचे कडवट पडसाद बंगालच नव्हे तर केरळ, तामिळनाडू, दिल्ली आणि अन्य राज्यांमध्ये उमटण्याची शक्यता आहे.
काय टाकली अट?
ममता बनर्जींनी काँग्रेसचे विद्यमान खासदार अधीररंजन चौधरी (बहरामपूर) आणि अबू हासेमखान चौधरी (मालदा दक्षिण) या मतदारसंघांव्यतिरिक्त भाजपविरोधात तृणमूल काँग्रेस कमजोर पडत असलेल्या दोन ते तीन जागा सोडण्याची तयारी दाखविली.
४२ मतदारसंघांपैकी तृणमूलचे ३२ ते ३३ जागांवर वर्चस्व आहे. त्यामुळे माकपशी कुठल्याही परिस्थितीत हातमिळवणी करणार नाही, या अटीवर उरलेल्या ८ ते ९ जागांपैकी काँग्रेसला ५ जागा देण्याची तयारी ममतांनी दाखवली आहे.