Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. आज सहाव्या टप्प्यातील मतदान होत आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदानापूर्वीच गोंधळ झाला आहे. यात एका टीएमसी कार्यकर्त्याची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. तमलूक लोकसभा मतदारसंघातील महिषादलमध्ये टीएमसी नेत्यावर हल्ला करण्यात आला आणि नंतर त्यांना तलावात फेकण्यात आले. शेख मैबुल असे मृताचे नाव आहे. या हत्येमागे भाजप कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप टीएमसी नेत्यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेख रात्री अकराच्या सुमारास दुचाकीवरून घरी परतत होते. त्यानंतर वाटेत अनेकांनी मिळून त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांना जवळच्या तलावात फेकून दिले. लोकांना समजल्यावर मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
यापूर्वी २२ मे रोजी नंदीग्राममध्येही हिंसाचार उसळला होता. येथे भाजपच्या एका महिला कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. यानंतर टीएमसी कार्यकर्त्यांवर आरोप करण्यात आले. हत्येविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी नंदीग्राममध्ये निदर्शने केली. अनेक ठिकाणी जाळपोळ व तोडफोडीच्या घटना घडल्या. यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता.
सहाव्या टप्प्यात पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूरसह आठ जागांवर मतदान होत आहे. सहाव्या टप्प्यात सात राज्यांतील ५८ जागांवर मतदान होत आहे. यावेळी पश्चिम बंगालमध्ये सातही टप्प्यात मतदान होत आहे. पश्चिम बंगालमधून मतदानादरम्यान हिंसाचार झाल्याच्या बातम्या येत आहेत. टीएमसी आणि भाजप एकमेकांवर आरोप करत आहेत.
सहाव्या टप्प्यात १५ मोठ्या लढती; तीन केंद्रीय मंत्री आणि तीन माजी मुख्यमंत्री रिंगणात
सहाव्या टप्प्यात तीन माजी मुख्यमंत्री आणि तीन केंद्रीय मंत्र्यांसह एकूण ८८९ उमेदवारांचे भवितव्य मतदार ठरवणार आहेत. भोजपुरी स्टार दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ आझमगडमधून, अभिनेता राज बब्बर गुडगाव लोकसभा मतदारसंघातून आणि मनोज तिवारी ईशान्य दिल्लीतून निवडणूक लढवत आहेत. आज लोकसभेच्या ५८ जागांसाठी मतदान होत आहे.
शनिवारी, दिल्लीच्या सात लोकसभा जागांवर १.५२ कोटींहून अधिक मतदार १३६३७ बूथवर मतदान करणार आहेत. शुक्रवारी राजधानीच्या विविध भागातून मतदान पक्ष बूथकडे रवाना झाले. मतदानाच्या कामासाठी एक लाख तीन हजारांहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कडक उन्हामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे आव्हानही निवडणूक आयोगासमोर असणार आहे. १२ मे २०१९ रोजी झालेल्या गेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीत ६०.५२ टक्के मतदान झाले होते.