तामिळनाडू सरकारचे मंत्री सेंथिल बालाजी यांना आज पहाटे ईडीने अटक केली. यानंतर अचानक त्यांच्या छातीत कळ आली. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले. आता डॉक्टरांनी त्यांच्या तब्येती संदर्भात अपडेट दिली आहे. त्यांना बायपास सर्जरी करायला सांगितले आहे. त्यांना हृदयविकाराचा गंभीर आजार असून, लवकरात लवकर त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयात त्यांची कोरोनरी अँजिओग्राम चाचणी करण्यात आली.
EDच्या छाप्यानंतर तामिळनाडूच्या ऊर्जामंत्र्यांना अटक, अचानक छातीत दुखायला लागलं; रुग्णालयात दाखल
सेंथिल बालाजी हे सध्या तामिळनाडू सरकारमध्ये ऊर्जा मंत्री आहेत. यापूर्वी ते AIADMK सरकारमध्ये परिवहन मंत्री होते. याच कालावधीत नोकरीसाठी घोटाळ्याप्रकरणी त्यांना ईडीने अटक केली आहे. याबाबत तामिळनाडूमध्ये खळबळ उडाली असून मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी ही केंद्र सरकारची सूडबुद्धीची कारवाई असल्याचे म्हटले आहे. २०११ ते २०१५ पर्यंत AIADMK सरकारमध्ये मंत्री असलेले सेंथिल हे जयललिता यांच्या कट्टर समर्थकांपैकी एक होते.
मात्र, जयललिता यांच्या निधनानंतर त्यांनी द्रमुकमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ते या पक्षाचे सदस्य असून त्यांना पुन्हा मंत्री करण्यात आले. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात जयललिता यांची निर्दोष मुक्तता झाल्यावर सेंथिल यांनी आनंदाने मुंडनही केले. तमिळनाडूमध्ये द्रमुक सरकारने काँग्रेससोबत आघाडी केली आहे. एमके स्टॅलिन म्हणाले की, जेव्हा सेंथिल बालाजी यांनी या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करणार असं सांगितले होते, तेव्हा त्यांना अटक का करण्यात आली. हा राजकीय छळ आहे.