नवी दिल्ली : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची हत्या झाल्यानंतर गँगस्टर नीरज बवानाशी संबंधित एक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. यात प्रत्युत्तरादाखल हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे.
या पोस्टमध्ये नीरज बवाना याला टॅग करण्यात आले आहे. त्याच्यावर हत्या आणि खंडणीची अनेक प्रकरणे दाखल आहेत आणि सध्या तो तिहार तुरुंगात आहे. या पोस्टला नीरज बवानाशी जोडले जात आहे. त्याचे साथीदार दिल्ली, हरयाणा, पंजाब आणि राजस्थानात पसरलेले आहेत.
भूप्पी राणा याच्या नावावर अशीच एक पोस्ट करण्यात आली आहे. तो नीरज बवानाच्या टोळीचा सदस्य आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ही अतिशय हृदयद्रावक घटना आहे. यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा सहकारी गोल्डी बरार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. मुसेवाला यांच्या हत्येत मदत करणाऱ्यांचा हिशेब करू. त्यांच्या मृत्यूचा लवकरच बदला घेऊ, असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मी मुस्लीम नाही, त्यामुळे... ; शे गिल भडकली
भारतीय गायक सिद्धू मुसेवालाच्या निधनानंतर सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिल्यामुळे पाकिस्तानी गायिका शे गिलवर पाकिस्तानातून जोरदार टीका होत असून नवा वाद सुरू झालाय. गैर-मुस्लिमांसाठी “दुआ” मागितल्याबद्दल शे गिलवर टीका होत आहे. ती मुस्लिम असून गैर-मुस्लिमांसाठी श्रद्धांजली कशी देऊ शकते, असा सवाल पाकिस्तानी सोशल मीडियातून विचारला जात आहे. लोक तिला प्रचंड ट्रोल करत असून कट्टरपंथी तिच्यावर विविध आरोपही करत आहेत. अखेर शे गिलनेही ट्रोलर्सवर पलटवार करत चोख प्रत्युत्तर दिले आहे.
“मन दुखावले... त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि त्यांच्या कुटुंबीयांना व मित्रांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो” असे शे गिलने सिद्धू मुसेवालासाठी श्रद्धांजली वाहताना लिहिले होते. पण, मुस्लिमांनी गैर मुस्लिमांसाठी “दुआ” मागू नये, असे तिला अनेक पाकिस्तानी नेटकऱ्यांकडून सुनावण्यात आले. ट्रोल करण्यासोबतच सोशल मीडियावर अनेकजण तिला खासगी संदेश टाकूनही खालच्या दर्जाची टीका करत आहेत. त्यावरून चिडलेल्या शेने अखेर काही स्क्रीनशॉट शेअर करून मला अशाप्रकारचे मेसेज केले तर तुम्हाला ब्लॉक करेन, असे सुनावले.
तसेच, “मी कोणालाही दुआ देऊ शकते आणि कोणासाठीही प्रार्थनादेखील करू शकते, कारण मी मुसलमान नाही. मी ख्रिश्चन आहे आणि ख्रिश्चन कुटुंबातच वाढलीये, त्यामुळे मी वेगवेगळ्या धर्माच्या लोकांसाठी प्रार्थना करू शकते” अशा शब्दात तिने सुनावले आहे. तसेच, प्रामाणिकपणे सांगायचे तर मी असे सार्वजनिक ठिकाणी जाहीर केले नसते. पण, लोकांचे विचार बघून करावे लागले, असेही लाहोर स्थित गायिकेने तिच्या इंस्टाग्रामवर सांगितले.