पाटणा - बिहारमध्ये घडलेल्या नाट्यमय घाडामोडींदरम्यान कुठलाही गाजावाजा न करता नितीश कुमार यांनी भाजपाला सत्तेतून बाहेरची वाट दाखवली. त्यानंतर नितीश यांनी लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीसोबत पुन्हा एकदा महाआघाडी करत पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबतही सूचक विधान केलं आहे.
नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर भाजपा, भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नियोजनबद्धरीत्या पलटवार केला. ते म्हणाले की, भाजपाला वाटलं होतं की, विरोधी पक्ष संपुष्टात येईल. मात्र आता आम्हीही विरोधी पक्षामध्ये आहोत. त्यानंतर नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, २०१४ मध्ये येणारे २०२४ मध्ये राहतील तेव्हा ना. आम्ही राहू अथवा न राहू. पण २०२४ मध्ये ते राहणार नाहीत. मी विरोधी पक्षांना २०२४ मध्ये एकजूट होण्याचं आवाहन करतो. मात्र पंतप्रधानपदासाठीच्या उमेदवारीबाबत विचारले असता नितीश कुमार यांनी सांगितले की, मी पंतप्रधानपदासाठी उमेदवार नाही आहे.
गेल्या ९ वर्षांत नितीश कुमार यांना दोन वेळा भाजपाची साथ सोडून आरजेडीसोबत घरोबा केला आहे. २०१३ मध्ये नितीश कुमार यांनी भाजपाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींची निवड केल्यानंतर त्याला विरोध करत भाजपासोबतची आघाडी मोडली होती. त्यांनंतर २०१५ मध्ये विधानसभा निवडणुकीत लालूंच्या आरजेडीसोबत महाआघाडी करत नितीश कुमार यांनी भाजपाचा दारुण पराभव केला होता. मात्र पुढे २०१७ मध्ये नितीश कुमार हे महाआघाडीची साथ सोडून पुन्हा भाजपासोबत एनडीएच्या गोटात दाखल झाले होते. त्यानंतर अटीतटीच्या झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत नितीश कुमार यांनी भाजपासोबत आघाडी करून विजय मिळवला होता. त्यानंतर आता नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा आरजेडीसोबत जवळीक करत आठव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.