नवरात्रीची पूजा पूर्ण करण्यासाठी आत्याने तिच्या पतीसोबत मिळून आपल्या भाच्याचा बळी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मागच्या महिन्यात छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला होता. दरम्यान, या २४ वर्षीय तरुणाच्या हत्येचं गुढ अखेर पोलिसांनी उलगडलं आहे. तसेच या तरुणाची हत्या त्याची आते आणि तिच्या पतीने केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दोघेही तो मृतदेह घेऊन विहिरीजवळ घेऊन गेले. मात्र तिथे गडबड ऐकून ते गोंधळले आणि त्यांनी तो मृतदेह विहिरीजवळ सोडून पळ काढला. दरम्यान, आता पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितले की, चैत्र नवरात्रीची पूजा पूर्ण करण्यासाठी आत्या आणि तिच्या नवऱ्याने भाच्याचा बळी दिला. मृत शानू पनिका ऊर्फ धनेश्वर हा चैत्र नवरात्रीदरम्यान त्याच्या आतेच्या घरी थांबला होता. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेली त्याची आते नवरात्र जवारा पूजेची १२ वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ पुतण्याचे केस आणि नखं कापून त्यांची आहुती देण्याच्या प्रयत्नात होती. रात्री शानू हा छतावर झोपला असताना त्याच्या आत्येने त्याचे केस आणि नखं कापण्याचा प्रयत्न केला. मात्र शानूने त्याला विरोध केला. त्यावेळी बजरंग याने त्याच्या गळा आवळला आणि आतेने तिथे असलेल्या एका हत्याराने त्याच्यावर वार केला. त्यामुळे शानू याचा मृत्यू झाला. त्यानंतर दोघांनीही त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे कुणाची तरी चाहूल लागल्याने त्यांनी तिथून पळ काढला.
शानू याचा मृतदेह आतेच्या घराजवळ सापडल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी हत्येची शंका व्यक्त केली होती. मृत शानूच्या शरीरावर खरचटल्याच्या खुण्या होत्या. तसेच त्याच्या पायाची नखंही उपटलेली होती. तसेच डोक्यावरही जखमेच्या खुणा होत्या. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचं पोस्टमार्टेम केलं. त्यामध्ये हत्येची बाब समोर आली. त्यानंतर पोलिसांनी शानूची आते आणि तिच्या पतीची चौकशी केली असता त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.
त्यानंतर पोलिसांना आरोपी आत्या अमरावती देवी आणि तिचा पती बजरंग यांच्याविरोधात भादंवि कलम ३०२, २०१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी अटक करून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.