नवी दिल्ली: काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) आज झालेल्या चार तासांच्या बैठकीत पक्षाची सत्ता असलेल्या सर्व राज्यांमध्ये जातीनिहाय जनगणना करण्यात येईल, असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत जातीनिहाय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेस शासित राज्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी हिमाचल प्रदेश, राजस्थान, कर्नाटक आणि छत्तीसगडमध्ये जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून, त्याची प्रत तुम्हाला लवकरच मिळेल, असं राहुल गांधी पत्रकार परिषदेत म्हणाले.
इंडिया आघाडीतील बहुतांश पक्षांचे जातीनिहाय जनगणनेवर एकमत केले आहे. काही पक्षांना अडचणी येऊ शकतात पण ते ठीक आहे. मात्र युतीतील बहुतांश पक्षांनी जातीनिहाय जनगणनेला सहमती दर्शवल्याची माहिती राहुल गांधींनी दिली. ही जातीनिहाय जनगणना गरीब लोकांसाठी आहे, असंही राहुल गांधींनी यावेळी सांगितले.
बिहार सरकारने जाहीर केली जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी-
बिहार सरकारने नुकतीच राज्यात झालेल्या जात जनगणनेची आकडेवारी जाहीर केली होती. या आकडेवारीनुसार, बिहारमधील लोकसंख्या ३६ टक्के अत्यंत मागास, २७ टक्के मागासवर्गीय, १९ टक्के अनुसूचित जाती आणि १.६८ टक्के अनुसूचित जमातीची आहे. त्याचा अहवाल बिहार सरकारचे मुख्य सचिव आणि इतर अधिकाऱ्यांनी जारी केला. बिहार सरकारने राज्यात जातीची लोकसंख्या १३ कोटींहून अधिक असल्याचे म्हटले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जातीनिहाय गणनेत एकूण लोकसंख्या १३ कोटी ७ लाख २५ हजार ३१० सांगितली आहे.