'Dolo-650 ची विक्री वाढवण्यासाठी कंपनीनं डॉक्टरांना वाटले 1000 कोटींचे गिफ्ट्स', याचिकाकर्त्याचा SC मध्ये दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 11:31 PM2022-08-18T23:31:59+5:302022-08-18T23:34:56+5:30
याचिकाकर्त्या फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनच्या वतीने वकील सजंय पारिख यांनी ही माहिती न्यायालयाला दिली आहे.
कोरोना महामारीच्या काळात अत्यंत लोकप्रीय झालेल्या Dolo-650 ची विक्री वाढवण्यासाठी कंपनीकडून डॉक्टरांना 1000 कोटींहून अधिकचे गिफ्ट्स वाटण्यात आले. उपचारासाठी रुग्णांच्या प्रस्क्रिप्शनवर याच औषधाचे नाव लिहावे, असा यामागचा हेतू होता, असा दावा याचिकाकर्त्याच्या वकिलाने केला आहे.
याचिकाकर्त्या फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनच्या वतीने वकील सजंय पारिख यांनी ही माहिती न्यायालयाला दिली आहे. यावेळी संजय पारिख यांनी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या (CBDT ) रिपोर्टचा हवाला दिला आहे. यावेळी पारिख म्हणाले, तापेच्या रुग्णांना डोलो- 650 चे नाव सुचवण्यासाठी एक हजार कोटी रुपयांहून अधिकचे गिफ्ट्स डॉक्टरांना वाटण्यात आले.
जस्टिस चंद्रचूड यांनी व्यक्त केलं आश्चर्य -
वकिलाने केलेल्या या दाव्याने, प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या जस्टिस चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला विचारात टाकले. यावर, वकील संजय पारिख यांना उद्देशून जस्टिस चंद्रचूड म्हणाले, 'आपण जे बोलत आहात, ते ऐकताना मला वाईट वाटत आहे. हे तेच औषध आहे, ज्याचा वापर कोरोना काळात मी देखील केला. मलाही हेच औषध घ्यायला सांगण्यात आले होते. हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे.
महत्वाचे म्हणजे, विक्री वाढविण्यासाठी डॉक्टरांना गिफ्ट्स वाटणाऱ्या औषध कंपनीची जबाबदारीही निश्चित करण्यात यावी, अशी मागणीही सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आली आहे. फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनकडून दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत म्हणण्यात आले आहे, की अशा प्रकरारच्या प्रकरणांत भ्रष्टाचारासाठी डॉक्टरांवर तर केस चलते, मात्र, औषध निर्माता कंपन्या वाचतात.
न्यायालयाने मागितले सरकारकडे उत्तर -
सुनावणीदरम्यान केंद्र सरकारकडून ASG एम नटराज यांनी बाजू मांडली. यावेळी, न्यायालयाने याचिकेतील मागण्यांवर केंद्र सरकारकडे एका आठवड्यात उत्तर मागितले आहे. यामुळे आता 10 दिवसांनंतर हे प्रकरण सुनावणीसाठी समोर येईल.