नवी दिल्ली : बाजारात विकल्या जाणाऱ्या सिगारेट आणि तंबाखूच्या पाकिटावर येत्या १ एप्रिलपासून धोक्याचा चित्ररूप व शब्दरूपी वैधानिक इशारा सध्याहून दुप्पट आकाराचा छापावा लागणार आहे.सध्या तंबाखू व सिगारेटच्या पाकिटांच्या दोन्ही बाजूंना ४० टक्के जागेवर तंबाखूपासून आरोग्यास होणाऱ्या अपायांचा धोका स्पष्ट करणारा वैधानिक इशारा छापावा लागतो. १ एप्रिलपासून पाकिटांच्या दोन्ही बाजूची ८५ टक्के जागा अशा इशाऱ्यासाठी द्यावी लागेल. या पैकी ४० टक्के जागेवर तंबाखूच्या सेवनाने कर्करोग होऊन पूर्णपणे सडलेले तोंड, गाल वा चेहरा यासारखे चित्र असेल. २० टक्के जागेवर ‘तंबाखूने कर्करोग होतो’, ‘तंबाखू प्राणघातक आहे’, ‘तंबाखू म्हणजे मृत्यूशी गाठ’ अशा प्रकारचा शाब्दिक इशारा इंग्रजी व हिंदी किंवा प्रादेशिक भाषेत छापावा लागेल. ‘सिगारेटस् अँड अदर टोबॅको प्रॉडक्ट्स (पॅकेजिंग अँड लेबलिंग) रूल्स, २००८ नुसार या संबंधीची अधिसूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी रात्री जारी केली. उत्पादकांना तयारी करण्यास सहा महिन्यांचा अवधी मिळावा यासाठी हा नवा नियम १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात येणार असल्याचे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. हे बंधन आयात केली जाणारी सिगारेटची पाकिटे व चघळून खाण्याच्या तंबाखूच्या पाकिटांनाही लागू असेल.राजस्थान उच्च न्यायालयाने रेटा लावल्याने केंद्र सरकारने घाईघाईत ही नवी अधिसूचना जारी केली आहे. केंद्र सरकारने मोठ्या आकाराच्या वैधानिक इशाऱ्याची अंमलबजावणी २९ सप्टेंबरपर्यंत करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर रोजी दिले होते.(लोकमत न्यूज नेटवर्क)
तंबाखू, सिगारेट पाकिटांवर धोक्याचा इशारा दुप्पट मोठा
By admin | Published: September 29, 2015 11:02 PM