नवी दिल्ली : 2 जी स्पेक्ट्रम वाटपातील काही गोपनीय वर्गीकृत दस्तऐवज फोडण्यात आल्याप्रकरणी सीबीआयने अंतर्गत तपास सुरू केला आहे. सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सीबीआय प्रतियुक्तिवाद करणार आहे. या घोटाळ्याचा खटला लांबविण्यासाठी सीबीआयचे संचालक रंजित सिन्हा यांनी वेळकाढूपणा चालविल्याचा आरोप सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या स्वयंसेवी संस्थेने केला आहे.
या संस्थेचे वकील प्रशांत भूषण यांनी सत्य विपर्यस्तरीत्या मांडल्याचे सीबीआयचे वकील पटवून देणार आहेत. कोळसा घोटाळ्याबाबत सीबीआयचे संचालक सिन्हा यांना सर्वोच्च न्यायालयाने समज दिल्याचा दावा सीबीआयने केला असून, त्याबाबत न्यायालयात बाजू मांडली जाण्याची शक्यता आहे. टीपण असलेल्या काही वर्गीकृत फाईल्स बाहेरच्या संस्थेला पुरविण्यात आल्याचा आरोप झाल्याच्या पाश्र्वभूमीवर सीबीआयने जबाबदारी निश्चित करण्यासाठी अंतर्गत तपास सुरू केला आहे. त्याबाबत ही संस्था न्यायालयाला माहिती देणार आहे.
सीबीआयकडून माहिती मिळवायची असल्यास आरटीआयच्या अनेक तरतुदी लागू होत नसताना, सदर स्वयंसेवी संस्थेने अंतर्गत टीपण कसे काय मिळविले, असा सवाल करीत सीबीआयने या संस्थेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)