अहमदाबाद : मुंबई-अहमदाबाद या बहुचर्चित बुलेट ट्रेन मार्गाच्या भूमिपूजनासाठी जपानचे पंतप्रधान शिंजो अबे हे भारतात दाखल झाले आहेत. उद्या गुरुवारी साबरमतीमध्ये हे भूमिपूजन होणार आहे. हा ५०८ किमीचा हा मार्ग २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यासाठी ७०० हेक्टरहून अधिक जमीन संपादित करण्यात येणार असून, ठाणे-वाशी भागातून ७ किमी समुद्राखालून ही रेल्वे धावणार आहे. याशिवाय ही रेल्वे मुंबईतून १५ किमी भूमिगत मार्गाने जाणार आहे.हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन आॅफ इंडियाची (एचएसआरसी) ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. एचएसआरसीचे अधिकारी हा प्रस्तावित मार्ग असल्याचे सांगत असले, तरी याला मंजुरी मिळणे ही औपचारिकता आहे. या मार्गाचे हवाई आणि भूभौतिक सर्वेक्षण झाले आहे. त्यानंतर, वाशी ते ठाणे हा मार्ग पाण्याखालून करण्यात यावा, असा निर्णय झाला. या योजनेसाठी गुजरातमध्ये ७०० हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी अधिकारी एक सर्वेक्षण करणार आहेत. बडोदा शहराजवळ ही रेल्वे ४५ डिग्रीचे वळण घेणार आहे. अहमदाबाद, बडोदा आणि सूरतमध्ये खासगी संपत्तींना याची झळ बसणार आहे. बहुतांश जमीन आनंद, नडियाद आणि अंकलेश्वर येथील आहे. (वृत्तसंस्था)बडोद्यात ट्रेनिंग सेंटरबडोदा येथे ६०० कोटी रुपये खर्च करून, ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती, हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने दिली. एनएचएसआरसीचे कार्यकारी संचालक आचल खरे यांनी सांगितले की, नॅशनल अकॅडमी आॅफ इंडियन रेल्वेच्या पाच हेक्टर जमिनीवर केंद्र उभारण्यात येईल. डिसेंबर २०२० पर्यंत हे केंद्र सुरू होईल.
बुलेट ट्रेनचे आज भूमिपूजन, ५०८ किमीचा मार्ग; ७०० हेक्टरहून अधिक जमिनीचे संपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 1:31 AM