पाटणा : भाजपचे खासदार ‘शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्षाप्रती निष्ठा अर्पण करतानाच भविष्यात काय होणार, कोण सांगू शकतो? अशा आशयाचे विधान करीत चर्चेचे पेव फोडले आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी शनिवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेतली होती. दुसऱ्याच दिवशी त्यांनी केलेल्या या विधानाने राजकीय वर्तुळात अटकळबाजीला उधाण आले आहे.मी नितीशकुमार यांच्याशी शनिवारी रात्री त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्याशी माझे खासगी आणि कौटुंबिक संबंध आहेत. आम्ही यापूर्वीही नेहमी भेटत राहिलो आहे, पण आता या भेटीबद्दल एवढा हलकल्लोळ का केला जात आहे? असा सवाल त्यांनी येथे पत्रकारांना केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बिहारचा दौरा केल्यानंतर काही तासांतच पाटणासाहिबचे खासदार असलेले शत्रुघ्न हे नितीशकुमार यांना भेटल्यामुळे ते भाजप सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मोदींनी सरकारमध्ये समावेश न केल्यामुळे सिन्हा नाराज आहेत, असे मानले जाते. राईचा पर्वतनितीशकुमार हे मला थोरल्या बंधूंप्रमाणे आहेत. मी पाटण्यात असलो की, किमान एकवेळा भेटायचे असा आमच्यात अलिखित करारच झाला आहे. लोक राईचा पर्वत बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा टोलाही त्यांनी हाणला. नितीशकुमार यांची प्रशंसा केल्याचे समर्थन करताना ते म्हणाले की, शेवटी ते बिहारचे गुणवान आणि पात्र मुख्यमंत्री आहेत आणि मी बिहारी बाबू आहे. मी दीर्घकाळापासून भाजपमध्ये आहे. हा माझा पहिला आणि अखेरचा पक्ष आहे. भाजप हा केवळ दोन खासदारांचा पक्ष असताना मी सहभागी झालो. मी या पक्षाच्या सुखदु:खाचा भागीदार राहिलो आहे. (वृत्तसंस्था)
आज भाजपसोबत, उद्याचे काय सांगावे?
By admin | Published: July 26, 2015 11:44 PM