पणजी, दि. 23- गोवा विधानसभेच्या दोन जागांसाठी बुधवारी मतदान पार पडतं आहे. बुधवारी सकाळीच मतदानाला सुरूवात झाली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सकाळी मतदान केलं. या पोटनिवडणुकीबद्दल आता काहीही बोलता येणार नाही पण निवडणूक महत्त्वपूर्ण असेल, अशी प्रतिक्रिया मतदान केल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली आहे. या पोटनिवडणुकीसाठी माजी केंद्रीय मंत्री तथा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पणजीतून आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे हे वाळपईतून नशीब अजमावत आहेत. 28 ऑगस्टला या पोटनिवडणुकीची मतमोजणी होणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर तर राणे यांची रॉय रवी नाईक यांच्याशी लढत आहे.
संरक्षणमंत्रिपदाचा राजीनामा देऊन मनोहर पर्रिकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री होणं पसंत केलं. त्यांच्यासाठी पणजीच्या आमदारकीचा सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी राजीनामा दिला. त्यामुळे पोटनिवडणूक होत आहे. माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंग राणे यांचे पुत्र विश्वजीत राणे यांनी काँग्रेसला रामराम करून भाजप सरकारमध्ये आरोग्यमंत्रिपद स्वीकारलं. त्यामुळे वाळपई विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.
पोटनिवडणुकीतून ‘आप’ची माघार गोव्याची राजधानी पणजी तसेच वाळपई विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने जाहीर केलं. या दोन्ही पोटनिवडणुका लढविणार असल्याचे पक्षाने यापूर्वी म्हटलेलं होतं. आम आदमी पक्षाने या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या विधानसभा निवडणुका पूर्ण ताकदीने लढवल्या होत्या; पण त्यांचा एकही उमेदवार टिकाव धरू शकला नव्हता. निवडणुकीनंतर पक्षाचे काम थंडावले आहे. पर्रीकर यांच्या विरोधातील मते विभागली जाऊ नयेत, मतदारांचा गोंधळ उडू नये तसेच पर्रीकर यांची कोंडी व्हावी, असं आपने म्हटलं होतं. जाहीर बोलण्याची ही भाषा असली तरी संघटनात्मक ताकद कमी असल्याने आपने निवडणुका लढविल्या असत्या तरी चित्र फारसे बदलले नसते, असे राजकीय जाणकारांना वाटते.
पणजी मतदारसंघातून भाजपचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे राष्ट्रीय सरचिटणीस गिरीश चोडणकर लढत देतील. भाषा माध्यमाच्या मुद्द्यावरून भाजपशी पंगा घेतलेल्या गोवा सुरक्षा मंच पक्षाने पक्षाचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनाच निवडणूक रिंगणात उतरविले आहे. पर्रिकर यांना बिनविरोध निवडून येण्याची संधी न देणे आणि निवडणुकीच्या माध्यमातून पर्रिकर यांच्यावर भाषा माध्यमाचा प्रश्न सोडविण्यासाठी दबाव टाकण्याची खेळी गोवा सुरक्षा मंच खेळण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेना त्यांना साथ देण्याची शक्यता आहे.