'कॅश फॉर क्वेरी' अर्थाता 'पैशांच्या बदल्यात प्रश्न' या आरोपावर शुक्रवारी झालेल्या चर्चेनंतर तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. या चर्चेदरम्यान महुआ मोइत्रा यांना लोकसभेत बोलू दिले गेले नाही. यानंतर आता, टीएमसी प्रमुख तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर (भाजप) निशाणा साधला आहे.
महुआ मोइत्रा यांच्या लोकसेभेतील सदस्यत्व रद्द झाल्यानंतर, दार्जिलिंगमधील एका कार्यक्रमात बोलताना ममता म्हणाल्या, "मी आपल्याला सांगत आहे की, महुआ मोइत्रा या परिस्थितीच्या बळी ठरल्या आहेत. मी याचा तीव्र निषेध करते. आमचा पक्ष महुआ यांच्यासोबत आहे. आमचा पक्ष INDIA सोबत एकत्रितपणे लढणार आहे. हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. आज, भाजपची भूमिका पाहून मला वाईट वाटते. त्यांनी लोकशाहीला कशा पद्धतीने धोका दिला आहे. त्यांनी महुआ यांना त्यांची बाजू मांडण्याची परवानगीही दिली नाही. पूर्णपणे अन्याय करण्यात आला आहे."
भारतीय संसदेसाठी हा दुःखाचा दिवस असल्याचे सांगत ममता म्हणाल्या, "मला वाटले होते की, पंतप्रधान या प्रकरणावर विचार करू शकतात. हा भारतीय संसदेसाठी एक दुःखाचा दिवस आहे. एवढेच नाही, तर हा निर्णय घाई घाईत घेण्यात आला. कारण 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काही दिवसच शिल्लक आहेत आणि महुआ किमान एका संसद सत्रात तरी भाग घेऊ शकत होत्या. याच बरोबर, “त्या पुढची लढाई जिंकतील. जनता भाजपला चोख उत्तर देईल. असा माझा धृड विश्वास आहे. भाजपने जनतेला धोका दिला आहे. जर आपण एवढेच शक्तीशाली आहात, तर त्यांना निवडणुकीतही हरवू शकला असतात. भाजपला लाज वाटायला हवी,'' असेही ममता म्हणाल्या.
यावेळी, आज लोकशाहीची ‘‘बायपास सर्जरी’’ झाल्याचे बोलत ममता म्हणाल्या, “495 पानांचा अहवाल सादर करण्यात आला आहे आणि त्यांनी सर्व पक्षांना अर्ध्या तासांचा वेळ दिला. अर्ध्या तासांत कोणी 495 पाने कसे वाचू शकेल? INDIA चे सदस्य महुआ यांच्या पाठीशी उभे राहिले. ते प्रत्युत्तराची लढाई लढतील. सर्व पक्षांनी आपली भूमिका घ्यावी. महुआ परिस्थितीचा बळी आहेत. आमचा पक्ष भाजपच्या सूडबुद्धीच्या धोरणांविरुद्ध भारतीय आघाडीसोबत एकत्र लढेल."