मुंबई - जगभरात आज पारसी नववर्षाला सुरुवात होत आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात पारसी नववर्षदिन साजरा करण्यात येतो. पासरी समुदायासाठी 360 दिवसांचे वर्ष असते, तर उर्वरीत 5 दिवस हे गाथा म्हणण्यासाठी असतात. पारसी नववर्षाला 'नवरोज' असेही म्हणतात. इस्रायल कँलेडरच्या पहिल्या दिवसाला पारसी नववर्षाला सुरुवात होते. महाराष्ट्रात 'पतेती' म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.
पतेती हा पारशी बांधवांचा नववर्ष दिवस आहे. महात्मा गांधी पारशी बांधवांविषयी म्हणाले होते की हा समाज भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत फक्त ०.००७% आहे. पण, त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. स्वातंत्र सैनिकांपासून ते उद्योजकांपर्यंत पारश्यांनी आपले वर्चस्व सिध्द केले आहे. इस्रायल कॅलेंडर प्रमाणे वर्षाच्या या पहिल्या दिवसाला 'नवरोज' म्हटले जाते. नवरोजचा अर्थ जणू सृष्टी नवीन हिरवा शालू अंगावर पांघरुन स्वागताला उभी आहे. या दिवशी अग्यारीत जाऊन प्रार्थना म्हटल्या जातात आणि खास पारशी भोजनाचा आस्वादही घेतला जातो.
दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पारसी समाजाला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा उत्सव लोकांमध्ये प्रेम, सद्भावना आणि भेटीगाठींना मजबूत बनवेल. पारसी नवनर्षानिमित्त देशातील सर्वच बंधु-भगिनींना माझ्याकडून शुभेच्छा. हे उत्सव सर्वांच्या आयुष्यात आनंद, उत्साह आणि समृद्धी आणेल, असे कोविंद यांनी त्यांच्या शुभेच्छासंदेशात म्हटले आहे.
पारसी जेवणाची मेजवानी
पारशी लोकांचे पदार्थ आवडीने हॉटेल्स मधून खाल्ले जातात. पारसी जेवण हे गुजराती आणि इराणीयन खाद्य संस्कृतीचा मिलाप आहे. पारसी जेवणात मुख्यत: भात आणि दालचा (घट्ट वरण) समावेश आहे. पारशी लोकं मांसाहाराचा वापरही मोठ्या प्रमाणात करतात. त्यामध्ये पात्रानू मच्छी, धनसाक, चिकन फर्चा, सली मूर्गीसारख्या पदार्थांचा सामावेश आहे. अंडी आणि अंडयाचे पदार्थ हे त्यांच्या नाश्यात असतात. स्क्रॅम्ब्ल्ड एग, पारसी आकूरी, पोरो हे काही लोकप्रिय पदार्थ. गोडात त्यांना शिरा, शेवया, फालूदा, कूल्फी अधिक आवडतात.