ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - बँक आणि एटीएमच्या रांगेत तासनतास ताटकळणा-या नागरीकांसाठी आजपासून पेट्रोल पंपावर कॅश काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. सरकारी तेल कंपन्यांच्या पेट्रोल पंपावर नागरीक त्यांच्या डेबिड कार्डचा वापर करुन २ हजार रुपयांपर्यंत कॅश काढू शकतात. सुरुवातीला निवडक अडीचहजार पेट्रोलपंपावर ही सुविधा मिळणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे कार्ड स्वाइप मशिन असलेल्या पेट्रोल पंपावरुन पैसे काढता येतील. लवकरच एचडीएफसी, सिटी बँक आणि आयसीआयसीआय बँकेचे कार्ड स्वाइप मशिन असलेल्या आणखी २० हजार केंद्रांवर ही सुविधा सुरु होईल. नव्या नोटांसाठी बँका आणि एटीएम केंद्राबाहेर लागणा-या रांगा कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपायोजना करण्यात येत आहेत.
याच प्रयत्नात साथ देण्याच्या हेतूने ऑल इंडिया पेट्रोलियम डिलर्स असोशिएशनने ही कल्पना मांडली. नागरीकांना दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असले तरी यामुळे पेट्रोल पंपावरील गर्दी वाढण्याचीही भिती आहे. पेट्रोल पंपावरुन कॅश काढण्याचीही सुविधा २४ नोव्हेंबरनंतरही सुरु रहाणार आहे. अत्यावश्यक सेवांसाठी ५०० आणि १ हजार रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्याची २४ नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे.