"आजचा निकाल मोदींजींच्या विरोधातला, हा त्यांचा नैतिक पराभव"; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 20:58 IST2024-06-04T20:53:37+5:302024-06-04T20:58:35+5:30
Mallikarjun Kharge Press Conference, Lok Sabha Result 2024: "मोदी पुन्हा संधी मिळाली तर लोकशाहीवर हल्ला होईल असा लोकांना विश्वास होता"

"आजचा निकाल मोदींजींच्या विरोधातला, हा त्यांचा नैतिक पराभव"; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
Mallikarjun Kharge Press Conference, Lok Sabha Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या २०२४च्या निकालासंदर्भात काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे उपस्थित होते. यावेळी खरगे यांनी निवडणूक निकालाच्या कलांवरून भाजपवर टीकास्त्र सोडले. "आजचे निकाल हे जनतेने दिलेले निकाल आहेत. हा लोकशाहीचा विजय आहे. आम्ही जनतेचा कौल नम्रपणे स्वीकारतो. आजचे निकाल मोदीजींच्या विरोधात आहेत. आम्हाला जनमत मान्य आहे आणि पक्षालाही मान्य आहे. मोदींना यंदा बहुमत मिळालेले नाही त्यामुळे हा मोदीजींचा नैतिक पराभवच आहे."
मल्लिकार्जुन खरगे पुढे म्हणाले, "या निवडणुकीत इंडिया आघाडीला त्रास दिला गेला. आमचा लढा शेवटपर्यंत पोहोचलेला नाही. लोकांना खात्री होती की मोदीजींना आणखी एक संधी मिळाली तर लोकशाही आणि संविधानावर हल्ला होईल. इंडिया आघाडीने अत्यंत प्रतिकूल वातावरणात निवडणूक लढवली. सरकारी यंत्रणेने प्रत्येक टप्प्यावर अडथळे निर्माण केले. बँक खाती जप्त करण्यापासून ते सर्व नेत्यांच्या विरोधात मोहीम चालवण्यापर्यंत. तरीही सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्वच नेत्यांच्या विरोधात लढले. काँग्रेस पक्षाचा प्रचार हा सकारात्मक होता, आम्ही महागाई, शेतकरी, बेरोजगारी, कामगारांची दुर्दशा, संवैधानिक संस्थांचा गैरवापर असे मुद्दे मांडले आणि लोकांमध्ये गेलो."
"पंतप्रधान मोदींनी ज्या प्रकारचा प्रचार केला, तो प्रदीर्घ काळ स्मरणात राहील. मोदीजींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत जे खोटे पसरवले होते ते जनतेला समजले. राहुल गांधींच्या प्रचाराला लाखो-कोटींचा पाठिंबा मिळाला. भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान लोकांच्या समस्या ऐकणे आणि नंतर त्या समस्यांवर उपाय शोधणे हा आमच्या मोहिमेचा एक भाग होता," असेही ते म्हणाले.