नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि एनडीएने दणदणीत विजय मिळवला आहे. तर काँग्रेस आणि यूपीएला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे, दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावी जबाबदारी स्वीकारली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र निकालानंतर काँग्रेसवर जोरदार टीका केली जात आहे. भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
देशात भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं आहे. मात्र सध्या जो विरोधी पक्ष आहे तो भ्रष्टाचारी आणि मूर्ख आहे अशी टीका सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीटरवरून काँग्रेसला टोला लगावला आहे. 'भाजपाचा अभूतपूर्व विजय झालेला आहे. अशात मला असं वाटतं की देशाला एका चांगल्या, स्वच्छ प्रतिमा असलेल्या, बुद्धीमान विरोधी पक्षाची गरज आहे. यामुळेच लोकशाहीचा आदर राखला जाईल, मात्र सध्याचा विरोधी पक्ष भ्रष्टाचारी आणि मूर्ख आहे' असं ट्वीट सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे.
लोकसभा निवडणूक निकाल 2019 : राजकारण हा पोरखेळ नाही, मनेका गांधींचा राहुल यांना टोला
देशाचे लक्ष लागून असलेल्या अमेठी लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाच्या नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी विजयी झाल्या आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी लोकसभा मतदारसंघामध्येही काँग्रेसला इतिहासामध्ये प्रथमच पराभव स्वीकारावा लागला आहे. राहुल गांधी अमेठीतून पराभूत झाल्यानंतर भाजपा नेत्या मनेका गांधी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राजकारण हा काही पोरखेळ नाही, अशा शब्दांत मनेका गांधी यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे. 'राजकारण हा काही पोरखेळ नाही. त्यांनी निवडणूक प्रचारात एकही योग्य मुद्दा उचलला नाही. केवळ गाडीत बसून हात उंचावला म्हणजे निवडणूक प्रचार झाला असं होत नाही. राजकारण करायचं तर व्यवस्थित आणि गंभीरपणे करा' असं मनेका गांधी यांनी राहुल गांधी यांना म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनेका यांनी ही टीका केली आहे.
राहुल गांधी अध्यक्षपद सोडण्याची शक्यता
लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवामागील कारणांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी, माजी पतंप्रधान मनमोहन सिंह, मल्लिकार्जुन खर्गे, गुलाब नबी आझाद, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी आपल्या काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा कार्यकारिणीसमोर सादर करण्याची शक्यता आहे.
पराभवाची जबाबदारी स्वीकारून काही राज्यांतील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, पक्षाचे संघटना मजबूत करण्यासाठी भविष्यकाळात काय उपाय योजता येतील, यावरही राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा होईल. लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला फक्त 52 जागांवर विजय मिळाला. 2014 च्या लोकसभा निवडणुकांत या पक्षाला फक्त 44 जागा मिळाल्या होत्या.