नवी दिल्ली/मुंबई- राज्यात भाजपाच्या नेत्यांकडून अनेकवेळा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारे वक्तव्य करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज संसदेत हाच विषय घेत महापुरुषांविषयी बोलताना कायद्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी केली. मात्र ते बोलत असताना अचानक त्यांचा माईक बंद करण्यात आल्याचे दिसून आले. सदर प्रकाराबाबत अमोल कोल्हे यांनी फेसबुकवर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली.
अमोल कोल्हे म्हणाले की, आज संसदेत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलत असताना माईक मध्येच बंद करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांसह इतर महापुरुषांविषयी बोलताना कायद्याची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी मी करत होतो. जेणेकरून आपल्या अस्मितेला नख लावण्याचं आणि छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचं धारिष्ट कोणीच करणार नाही, असं अमोल कोल्हे म्हणाले. तसेच संसदेतला माईक बंद केला तरी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीची भावना दाबता येणार नाही, तो तमाम शिवभक्तांचा आवाज कानठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही, असंही अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.
दरम्यान, उपराष्ट्रपती झाल्यानंतर धनखड यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बुधवारी पहिल्यांदाच राज्यसभेचे कामकाज चालवले." धनखड यांचे स्वागत करताना पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यसभा आपला वारसा केवळ पुढे नेणार नाही तर नवीन उंचीवर नेईल, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती म्हणून दलित पार्श्वभूमी आणि विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आदिवासी पार्श्वभूमीचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, धनखड हे शेतकऱ्याचे सुपुत्र आहेत आणि आज ते देशाच्या गावाचे, गरीब आणि शेतकयांच्या ऊर्जेचे वरिष्ठ सभागृहात प्रतिनिधित्व करत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"