ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3- मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशिनमध्ये फेरफार करता येत असल्याचा आरोप राजकीय पक्षांनी केला होता. निवडणुक आयोगावर राजकीय पक्षांकडून आरोप झाल्यानंतर ईव्हीएम मशिन हॅक करून दाखवा, असं खुलं चॅलेन्ज निवडणूक आयुक्त नसिम झैदी यांनी दिलं होतं. आजपासून निवडणूक आयोगाकडून हॅकेथॉनचं आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात उत्तराखंड हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कोणताही राजकीय पक्ष, व्यक्ती, मीडिया याशिवाय सोशल मीडियावर ईव्हीएमसंदर्भात टीका करायला कोर्टाने मनाई केली आहे.
न्यायाधिश शरद कुमार आणि राजीव शर्मा यांच्या खंडपीठाने म्हटलं आहे, सगळे राजकीय पक्ष, एनजीओ, व्यक्ती नुकत्याच झालेल्या निवडणुकांवर टीका करू शकत नाही. निवडणुक आयोगाने यशस्वी आणि निपक्ष निवडणुकीचं आयोजन केलं होतं. राजकीय पक्षांना संविधानाची प्रतिमा मलिन करण्याचा अधिकार नाही आहे. निवडणुक प्रक्रीयेवर लोकांचा विश्वास कायम ठेवणं महत्त्वाचं आहे. स्वतंत्र आणि निपक्ष निवडणुक करणं ही संविधानाची जमेची बाजू आहे.
देशातील विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशिममध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस आणि आपसह इतर राजकीय पक्षांनी केला होता. त्यानंतर इव्हीएम मशिन पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा देत निवडणूक आयोगाने ३ जून रोजी मशिन हॅक करून दाखवण्याचं आव्हान दिलं होतं. पण काँग्रेस नेते डॉ. रमेश पांडे यांनी आयोगाला अशाप्रकारचं ‘हॅकेथॉन’ आयोजित करण्याचा कायदेशीर अधिकार नसल्याचं सांगत कोर्टात धाव घेतली होती.
दरम्यान, निवडणूक आयोगाकडून ‘हॅकेथॉन’ची तयारी पूर्ण झाली आहे. त्यानुसार हे आव्हान स्वीकारलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या पक्षाला उत्तराखंड तसंच उत्तर प्रदेश निवडणुकांच्या वेळी वापरण्यात आलेल्या 14 मशिन देण्यात येणार आहेत. हॅकेथॉनसाठी निमंत्रीत केलेल्या राजकीय पक्षांनी आज सकाळी 10 ते 2 या वेळेत त्या हॅक करून दाखवायचा आहेत.