नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत होती. मात्र लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातलं मतदान संपताच पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल 5 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 76.78 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 9 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 69.35 रुपयांवर गेला आहे.
दिल्लीकरांनाही इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. दिल्लीत पेट्रोलचे दर 5 पैशांनी तर डिझेलचे दर 9 पैशांनी वधारले आहेत. त्यामुळे आज दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे 71.17 रुपये आणि 66.2 रुपये मोजावे लागतील.
(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम - दिल्ली)
पेट्रोल, डिझेल दरात झालेली वाढ नियमित स्वरुपाची असून त्यात काहीच चुकीचं नसल्याचं सरकारी इंधन कंपन्यांनी सांगितलं. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या काळात सरकारनं कंपन्यांना इंधन दर स्थिर ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. गेल्या काही दिवसात इंधन कंपन्यांनी फारशी वाढ केलेली नव्हती. या काळात झालेलं नुकसान आता भरुन काढण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात इंधनाचे दर भडकतील, अशी दाट शक्यता आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे.
(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम - मुंबई)
जागतिक इंधन बाजारातील स्थिती सध्या फारशी चांगली नाही. अरब राष्ट्रांमधील तणाव, इराण, व्हेनेझुएलामधून कमी झालेला तेल पुरवठा यामुळे इंधनाचे दर वाढत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात देशात पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका उडू शकतो. सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च-एप्रिल महिन्यात इंधन कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रती लीटरमागे 5 रुपये, तर डिझेल दरात प्रती लीटरमागे 3 रुपयांची सवलत दिली होती. या सवलतीमुळे झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी इंधन कंपन्यांकडून दर वाढ केली जाण्याची दाट शक्यता आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा दर प्रती बॅरलमागे 70 डॉलरहून अधिक आहे. गेल्या ऑगस्टमध्ये खनिज तेलाचा दर इतका असताना भारतात पेट्रोलचा दर 78 रुपयांच्या, तर डिझेलचा दर 70 रुपयांच्या आसपास होते. मात्र सध्याच्या घडीला भारतात पेट्रोल 73, तर डिझेल 67 रुपयांनी विकलं जात आहे. त्यामुळे इंधन कंपन्यांना नुकसान सोसावं लागत आहे. मतदानाचे सातही टप्पे पूर्ण झाल्यानं आता लवकरच इंधन दरवाढीची झळ बसण्याची शक्यता आहे.