नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर वाढले आहेत. जगातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या सौदी अराम्कोकडून होणाऱ्या खनिज तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत शुक्रवारी (20 सप्टेंबर) पेट्रोल 34 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 78.73 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 69.53 रुपयांवर गेला आहे.
गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात घट होत होती. मात्र त्यानंतर आता पुन्हा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. दिल्लीकरांनाही इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. दिल्लीत पेट्रोलचे दर 35 पैशांनी तर डिझेलचे दर 28 पैशांनी वधारले आहेत. त्यामुळे आज दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे 73.06 रुपये आणि 66.29 रुपये मोजावे लागतील.
(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम - दिल्ली)
गेल्या चार दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारी (19 सप्टेंबर) मुंबईत पेट्रोल 29 पैशांनी महागले होतं. त्यामुळे मुंबईकरांना पेट्रोलसाठी 78.39 रुपये मोजावे लागले. तर डिझेलच्या दरातही वाढ झाली त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 69.23 रुपयांवर आला होता. तसेच दिल्लीतही इंधनाचे दर वाढले होते. दिल्लीतही पेट्रोल 29 पैशांनी महाग झालं. त्यामुळे एक लिटर पेट्रोलसाठी 72.71 रुपये मोजावे लागले तर डिझेलच्या दरात 19 पैशांची वाढ झाली. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर 66.01 रुपयांवर आला होता.
(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम - मुंबई)
सौदी अरेबियातील सौदी अराम्को कंपनीवर ड्रोन हल्ले झाल्याचा फटका भारताला बसला आहे. जगातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या सौदी अराम्कोकडून होणाऱ्या खनिज तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यानं लवकरच इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीच्या अहवालातून हा अंदाज वर्तवण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या किमतींमुळे इंडियन ऑईल, एचपीसीएल आणि बीपीसीएलच्या नफ्यावर परिणाम झाला. 'खनिज तेलाचे दर वाढत असल्यानं सरकारी तेल कंपन्यांचा तोटा वाढू शकतो. त्यामुळे लवकरच त्यांच्याकडून भाव वाढ केली जाऊ शकते,' असं कोटकनं आपल्या अहवालात म्हटलं होतं.
भारताच्या एकूण आयातीचा विचार केल्यास त्यात सर्वाधिक वाटा खनिज तेलाचा आहे. भारत दररोज 5.7 मिलियन बॅरल खनिज तेल आयात करतो. त्यामुळे खनिज तेलाचे दर वाढल्यास व्यापारी तूटदेखील वाढू शकते. खनिज तेलाचे दर सध्या 10 टक्क्यांनी वाढले आहेत. खनिज तेलाच्या आयातीवरील खर्च वाढणार आहे. याचा परिणाम सध्या अडचणींचा सामना करणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल. सौदी अराम्को लवकरच संपूर्ण ताकदीनं उत्पादन सुरू करुन आंतरराष्ट्रीय बाजारातला खनिज तेलाचा पुरवठा सुरळीत करेल, अशी माहिती सौदी अरेबियानं दिली आहे. याशिवाय अमेरिकादेखील त्यांच्याकडे असणारा तेलाचा साठा बाजारात आणू शकते.