नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असतानाच गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ होत आहे. पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. शनिवारी (10 जुलै) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल 34 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 106.93 रुपये मोजावे लागतील. तर डिझेलच्या दरात वाढ 28 पैशांची वाढ झाली. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 97.46 रुपये आहे. सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार आला असून अनेक राज्यात पेट्रोलने शंभरी पार केली आहे. तर डिझेलच्या किमतीत देखील वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
दिल्लीकरांनाही इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागत आहेत. दिल्लीत पेट्रोलचे दर 35 पैशांनी वधारले आहेत. तर डिझेल 26 पैशांनी महागले आहे. त्यामुळे आज दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे 100.91 रुपये आणि 89.88 रुपये मोजावे लागतील. भोपाळमध्ये पेट्रोल 109.24 रुपये तर डिझेल 98.67 रुपये आहे. तर कोलकातामध्ये लोकांना पेट्रोलसाठी 101.01 रुपये आणि डिझेलसाठी 92.97 रुपये मोजावे लागतील. दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, जम्मू-कश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब, लद्दाख आणि सिक्किममध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे.
दिल्लीमध्ये सीएनजीही महागला
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांबरोबरच आता दिल्ली आणि परिसरामध्ये सीएनजीच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये सीएनजी पुरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ कंपनीने किलोमागे सीएनजीच्या दरामध्ये 90 पैशांनी वाढ केली आहे. याशिवाय पाईपद्वारे पुरविण्यात येणाऱ्या स्वसंपाकाच्या गॅसच्या दरामध्येही एक घनमीटरला 1.25 रुपयांची वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढीमुळे ही दरवाढ आहे.
वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरुन विरोधकांनी केंद्रावर जोरदार निशाणा साधला आहे. याच दरम्यान भाजपाच्या एका प्रवक्त्यांनी मात्र या दरवाढीवर अजब विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कांदा, टोमॅटो आणि पेट्रोलच्या किंमती कमी करण्यासाठी नव्हे तर भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आले असल्याचं म्हटलं आहे. दिल्ली भाजपा प्रवक्त्या सारिका जैन (Sarika Jain) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) कांदा, टोमॅटो आणि पेट्रोलची किंमती कमी करण्यासाठी नव्हे तर भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आले असल्याचे म्हटले. तसेच सारिका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिहेरी तलाक, कलम 370 रद्द करून अयोध्येत राम मंदिर तयार करण्यास सुरुवात करुन असे काम केले आहे, ज्यासाठी इतिहास त्यांना नेहमीच लक्षात ठेवेल असं देखील म्हटलं आहे.