नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या किमती दररोज वाढत असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोलच्या दरवाढीने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोल पुन्हा एकदा महागलं आहे. मुंबईत सोमवारी (12 जुलै) पेट्रोल 27 पैसे प्रति लिटरने महाग झाले आहे. यामुळे मुंबईत आजचा पेट्रोलचा प्रति लिटर दर 107.20 तर डिझेलच्या दरात घट झाली आहे. डिझेल 17 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईतील लोकांना डिझेलसाठी 97.29 रुपये मोजावे लागणार आहेत.
दिल्लीत आज पेट्रोल 28 पैशांनी महागले आहे तर डिझेल 16 पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे 101.19 रुपये आणि 89.72 रुपये मोजावे लागतील. भोपाळमध्ये पेट्रोल 109.53 रुपये तर डिझेल 98.50 रुपये आहे. तर कोलकातामध्ये लोकांना पेट्रोलसाठी 101.01 रुपये आणि डिझेलसाठी 92.81 रुपये मोजावे लागतील. दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, जम्मू-कश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब, लद्दाख आणि सिक्किममध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे.
"खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजपा नेत्यांची जुनी सवय"; रोहित पवारांचा फडणवीसांवर हल्लाबोल
पेट्रोलवर (Petrol) लावण्यात येणाऱ्या करातले 12 रुपये राज्यांना मिळतात असं विधान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) यांनी पुण्यामध्ये केलं होतं. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP Rohit Pawar) यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजपा नेत्यांची जुनी सवयच आहे" असं म्हणत रोहित पवार देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. तसेच दिवसाढवळ्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असं धडधडीत खोटं बोलणं कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही असंही म्हटलं आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ शेअर करून भाजपाची चांगलीच पोलखोल केली आहे. "खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजपा नेत्यांची जुनी सवयच आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले 12 रुपये राज्यांना मिळतात असं हास्यास्पद विधान भाजपाकडून पुण्यात करण्यात आलं. देशात इतर कुठंही ही चलाखी चालून गेली असती पण महाराष्ट्रात नाही" असं म्हटलं आहे.
त्रास सहन केला तरच आनंद उपभोगता येतो; इंधन दरवाढीवरून भाजप मंत्र्यांचे वक्तव्य
देशातील जनता पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे होरपळली आहे. त्यात दिलासा देण्याऐवजी मध्यप्रदेशातील मंत्री ओमप्रकाश सकलेचा यांनी जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे वक्तव्य केले आहे. आता त्रास होत आहे. मात्र, त्याशिवाय आनंद उपभोगता येणार नाही, असे सकलेचा म्हणाले. देशातील चारही महानगरांमध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी पूर्ण केली आहे. प्रमुख शहरांमध्येही पेट्रोलचे दर शंभर रुपये प्रति लिटरहून अधिक आहेत. काही राज्यांमध्ये पेट्रोलसोबतच डिझेलच्या दरांनीही शतक पूर्ण केले आहे. त्यामुळे महागाईदेखील आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशा स्थितीत जनतेला दिलासा देण्याऐवजी महागाईच्या जखमेवर मीठ चोळल्याप्रमाणे वक्तव्य सकलेचा यांनी केले.