नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत होती. मात्र दर कपातीनंतर आता पुन्हा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. शुक्रवारी (22 नोव्हेंबर) पेट्रोल दरात वाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल 15 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 80 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 69 रुपये आहे.
दिल्लीकरांनाही इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. दिल्लीत पेट्रोलचे दर 15 पैशांनी वधारले आहेत. त्यामुळे आज दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे 74.35 रुपये आणि 65.84 रुपये मोजावे लागतील.
(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम - दिल्ली)
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ होत आहे. 19 नोव्हेंबर रोजी मुंबईत पेट्रोल 15 पैशांनी महागलं होतं. त्यामुळे मुंबईकरांना पेट्रोलसाठी 79.86 रुपये मोजावे लागले. मात्र डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 69 रुपयांवर आला होता. तसेच दिल्लीतही इंधनाचे दर वाढले आहेत. दिल्लीतही पेट्रोल 15 पैशांनी महागलं होतं. त्यामुळे एक लिटर पेट्रोलसाठी 74.2 रुपये मोजावे लागतील तर डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर 65.84रुपयांवर आला आहे.
(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम - मुंबई)
पेट्रोल पंपावर मापात पाप करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी अनोखं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. पंपावर गाडीत पेट्रोल भरल्यानंतर एक नोटिफिकेशन येणार आहे. हे नोटिफिकेशन मोबाइलच्या माध्यमातून मिळणार असून, आपण गाडीत किती पेट्रोल भरलं ते अचूकरीत्या सांगणार आहे. आयआयटी विद्यार्थ्यांनी प्राध्यापक नचिकेत तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे फ्यूल क्वांटिफायर डिवाइस तयार केलं आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर होणारी चोरी रोखता येणार असून, मापात पापही करता येणं कठीण होणार आहे. फ्यूल क्वांटिफायर डिवाइस हे कोणत्याही कार, मोटारसायकल, स्कूटर आणि स्कूटीमध्ये लावू शकतो. विशेष म्हणजे हे डिवाइस लावल्यानंतर वाहनात कोणताही बदल करण्याची आवश्यकता नसते. पेट्रोल टँकमध्ये हे डिवाइस बसवण्यात येणार आहे. ज्याच्या माध्यमातून गाडीच्या टाकीत किती पेट्रोल टाकण्यात आलं हे समजणार आहे. त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाइलवर येणार आहे.
वाहनचालक पेट्रोल पंपावर लावण्यात आलेलं मीटर आणि मोबाइलमध्ये असलेल्या डाटा पडताळूनही पाहू शकतो. हे डिवाइस ब्लू टुथच्या माध्यमातून कनेक्ट होणार आहे, त्यामुळे याचे नोटिफिकेश मोबाइलवर समजणार आहेत. माझ्या मार्गदर्शनात पीएचडी, एमटेकच्या विद्यार्थ्यांनी हे डिवाइस विकसित केलं आहे. हे डिवाइस बनवण्यासाठी जवळपास आठ महिन्यांचा वेळ लागला होता. या डिवाइसच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात आलेला असून, मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच ते बाजारात उपलब्ध होणार आहे. तसेच या डिवाइसची किंमत जास्त नसणार आहे.