- शीलेश शर्मा, नवी दिल्ली
काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आज शुक्रवारी जंतरमंतरहून संसदेपर्यंत मार्च काढत, मोदी सरकारच्या लोकशाहीविरोधी धोरणाचा जोरदार निषेध करणार आहेत. मोदी सरकारला घेरण्याच्या उद्देशाने काढल्या जाणाऱ्या या रॅलीत उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह कार्यकारिणीचे सदस्य, सर्व खासदार आणि प्रादेशिक नेते सहभागी होणार असून, या प्रसंगी सोनिया गांधी सरकारविरुद्ध मोठी घोषणा करतील, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.मोदी सरकार न्यायालयांना धमकी देत असून, या संस्थांवर सुनियोजितरीत्या हल्ला करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्यावरून रालोआ सरकार लोकशाही मूल्यांचा गळा घोटत आहे. निवडून निवडून संवैधानिक संस्था संपविल्या जात आहेत. लोकशाही मार्गाने स्थापन झालेल्या काँग्रेसच्या सरकारांना फूट पाडत खाली खेचले जात आहे. सर्वात आधी अरुणाचल प्रदेशमधील सरकार पाडल्यानंतर उत्तराखंडमध्ये तोच प्रयोग करण्यात आला. हिमाचलचे सरकार पाडण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. विद्यापीठांच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप करीत, त्यांची स्वायत्तता संपुष्टात आणण्याचा सरकारने खटाटोप चालविला आहे, विद्यार्थ्यांवर विचारधारा लादण्याचा त्यामागे मूळ उद्देश आहे, असे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी म्हटले. विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवाजे बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेएनयू, अलाहाबाद, हैदराबाद विद्यापीठे उदाहरणांच्या रूपाने समोर आहेत. या सर्व मुद्द्यांवर सरकारविरुद्ध या रॅलीत लढ्याची घोषणा केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.विरोधकांची एकजूट; रॅली मात्र काँग्रेसचीच..!विरोधक संसदेत व बाहेर एकजूट होत मोदी सरकारविरुद्ध लढणार असले, तरी शुक्रवारच्या रॅलीत केवळ काँग्रेसचा सहभाग राहील. संसदेकडे डोळेझाक होत असल्याचे इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे. जंतरमंतरवर सोनिया गांधी यांच्यासह अनेक नेते भाषणही करतील. अगुस्ताप्रकरणी सत्य समोर आणण्याचा प्रयत्नही काँग्रेस करणार आहे.काँग्रेसच्या सरकारांना खाली खेचले जात आहे. आधी अरुणाचलमधील सरकार पाडल्यानंतर उत्तराखंडमध्ये तोच प्रयोग करण्यात आला. आता हिमाचलचे सरकार पाडण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप कॉँग्रेसने केला आहे.