- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : हेरगिरी आणि विघातक कारवायांच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध भारताने केलेल्या याचिकेवर नेदरलँड््समधील दी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय गुरुवारी निकाल देणार आहे.सोमवारी भारत व पाकिस्तानचा युक्तिवाद संपल्यावर १४ न्यायाधीशांच्या या न्यायालयाने निकाल कधी देणार ते कळवू, असे सांगितले होते. त्याप्रमाणे, न्यायालयाकडून भारत सरकारला कळविण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतीय प्रमाण वेळेनुसार गुरुवारी दु. ३.३० वाजता निकाल दिला जाणे अपेक्षित आहे.ही शिक्षा रद्द करावी अथवा अंतिम निर्णय होईपर्यंत स्थगिती द्यावी, अशी भारताची विनंती आहे. पाकिस्तानने मात्र, तातडीने स्थगिती देण्याची गरज नाही. कारण जाधव यांना आमच्याच देशात अपील करण्यास पाच महिन्यांचा अवधी आहे, असे म्हटले. मात्र, मध्यंतरी जाधव यांच्या आईने केलेले जे अपील भारतीय उच्चायुक्तांनी सुपुर्द केले, त्याचे पुढे काय झाले ते पाकिस्तानने कळविलेले नाही.