चेन्नई : श्रीहरीकोटा येथून बुधवारी सकाळी ५.३० वाजता आरआयसॅट-२बी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार असून, त्याच्या उड्डाणाची२५ तासांची उलटगिणती मंगळवारी पहाटे ४.३० वाजता सुरू झाली, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) दिली. हा सर्व प्रकारच्या हवामानात रडार इमेजिंगद्वारे निगराणी करणारा हा उपग्रह आहे.
पीएसएलव्ही-सी४६ ची ही ४८वी मोहीम असून, सतीश धवन अंतराळ केंद्रातून हा ६१५ किलो वजनाचा उपग्रह प्रक्षेपण केल्यानंतर१५व्या मिनिटाला पृथ्वीच्या कक्षेत सोडला जाईल. हा उपग्रह गुप्त निगराणी, कृषी, वन व आपत्ती व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रांत मोलाची मदत करणार आहे. इस्रोसाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, अशी माहिती इस्रोचे प्रमुख के. शिवन यांनी दिली. तसेच या मोहिमेबाबत जास्त माहिती देण्यास नकार दिला.
आरआयसॅट-२बी हा उपग्रह २००९ मध्ये प्रक्षेपित केलेल्या आरआयसॅट-२ या उपग्रहाची जागा घेईल. नवा उपग्रह पृथ्वीची छायाचित्रे दिवसा आणि रात्रीही घेऊ शकणार आहे. तसेच ढगाळ हवामानांच्या स्थितीतही उपग्रह आपले काम चोख बजावणार आहे. या उपग्रहाचे आयुष्य पाच वर्षांचेआहे व ते लष्करी निगराणीसाठीही काम करणार आहे. सध्याचा आरआयसॅट-२ उपग्रह हाही सीमावर्ती भागावर बारीक नजर ठेवून होता व पाकिस्तानच्या संभाव्य घुसखोरीची खबर देत होता.
इस्रोचे या वर्षातील पीएसएलव्हीचे हे तिसरे प्रक्षेपण असेल. २०१९मध्ये १ एप्रिल रोजी एमिसॅट व २९ आंतरराष्टÑीय उपग्रह अंतराळात सोडलेले आहेत.२४ जानेवारी रोजी मायक्रोसॅट-आर व कलामसॅट-व्ही२ उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित केलेले आहेत. इस्रोने आरआयसॅट-१ (रडार उपग्रह-१) हा मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग उपग्रह २६ एप्रिल २०१२ रोजी सोडण्यात आला होता. (वृत्तसंस्था)
चंद्रावर दुसरी मोहीम जुलैमध्येउपग्रहाच्या प्रक्षेपणापूर्वी तिरूपती बालाजीच्या मंदिरात पूजा-अर्चना केल्यानंतर इस्रोचे प्रमुख के. शिवन यांनी सांगितले की, आरआयसॅट-२बी नंतर इस्रोचे संपूर्ण लक्ष चंद्रयान-२वर आहे. त्याचे प्रक्षेपण ९ ते १६ जुलैच्या दरम्यान केले जाणार आहे. चंद्रयानच्या मोहिमेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. इस्रो ६ सप्टेंबरपर्यंत चंद्रयान-२ च्या रोव्हरला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याच्या प्रयत्नात आहे.