शीलेश शर्मा नवी दिल्ली :काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी शुक्रवारी होणाऱ्या कार्य समितीच्या बैठकीत पक्षाचे महाधिवेशन आणि नव्या अध्यक्षाच्या निवडणुकीबाबत निर्णय घेतील. उच्चपदस्थ सूत्रांनुसार २२ जानेवारीच्या या बैठकीत हाही निर्णय घेतला जाईल की, नव्या अध्यक्षाच्या निवडणुकीसह महाधिवेशनादरम्यानच कार्य समितीच्या सदस्यांची निवडणूक घ्यावी की नाही. ग्रुप २३ सतत नेतृत्वावर कार्य समितीच्या सदस्यांची निवड करण्यासाठी दबाब टाकत आहे. कारण सध्या कार्य समितीच्या सदस्यांना अध्यक्षांकडून नियुक्त केले जात आहे. ग्रुप २३चा मात्र या पद्धतीला विरोध आहे. त्याची मागणी अशी आहे की, तिरूपती अधिवेशनाच्या धर्तीवर पारदर्शितेसह निवडणूक घेतली जावी. महाधिवेशन कुठे व्हावे याचाही निर्णय बैठकीत घेतला जाऊ शकतो. सूत्रांनुसार रायपूर, जयपूर, चंदीगड किंवा दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यानंतर हे महाधिवेशन घेतले जाईल.
कार्यक्रमपत्रिकेवर काय असतील विषय?संघटनात्मक निवडणुकांशिवाय या व्हर्च्युअल बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केल्या जाणाऱ्या मुद्यांवरही चर्चा होईल. कार्य समितीच्या एका सदस्याने ‘लोकमत’ला सांगितले की, संसदेत उपस्थित केल्या जाणाऱ्या मुद्यांबरोबर पक्षाची संसदेत काय रणनीती असावी, विरोधी पक्षांना कसे एकत्र बांधायचे आदी प्रश्नही चर्चेचे विषय होतील. शेतकऱ्यांचे आंदोलन, अर्णब गोस्वामी लीक प्रकरण, तेलाचे वाढते दर, कोरोना लसीकरण आदी विषयही कार्यक्रमपत्रिकेवर असतील.