बंगळुरू येथील एचएसआर लेआउटमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वडिलांच्या कारखाली चिरडल्यामुळे एका मुलीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना जवळच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या संपूर्ण घटनेदरम्यान वडिलांना आपली मुलगी आपल्या गाडीखाली चिरडल्याचं लक्षात न आल्याने त्यांनी गाडी पुढे नेली.
मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब सोमवारी एका लग्न समारंभातून घरी परतले होते. सर्वजण गाडीतून खाली उतरून घरात गेले. वडिलांनी गाडीतून सर्व सामान काढून आत ठेवले आणि मग बाहेर येऊन पुन्हा गाडीत बसले. त्यांना गाडी पार्क करायची होती. यावेळी लहान मुलगीही बाहेर आली होती आणि गाडीजवळ उभी होती. पण वडिलांना याबाबत माहिती नव्हती.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, वडील सामान ठेवून घराबाहेर पडले आणि गाडीत बसताच त्यांची मुलगीही घराबाहेर आली. ते गाडीत बसत असतानाच त्यांची मुलगी बाहेर येऊन गाडीच्या मागे उभी राहिली. यामुळे ते तिला येत असताना पाहू शकले नाही. लहान मुलगी असल्याने ती कारच्या खिडकीतूनही दिसली नाही.
गाडी पुढे सरकताच मुलगी खाली पडली आणि कार तिच्या अंगावरून गेली. मुलगी गाडीच्या चाकाखाली आल्याने गाडी काही सेकंद थांबली, त्यानंतर गाडी पुढे घेऊन वडील गेले आणि मुलगी तिथेच पडून राहिली. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.