नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपाचे अध्यक्ष खा. अमित शहा यांनी मंगळवारी परस्परांच्या बालेकिल्ल्यांत शिरून एकमेकांवर तुफानी हल्लाबोल केला.काही महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार असलेल्या गुजरातच्या दुस-या दिवशीच्या दौºयात राहुल गांधी यांनी शहा, पंतप्रधाननरेंद्र मोदी व भाजपावर बोचरी टीका केली, तर खा. राहुल गांधी यांच्या अमेठी या मतदारसंघामध्ये अमित शहा यांनी थेट राहुल गांधींवर तोफ डागली.राहुल गांधी व अमित शहा यांनी दिवसभरात एकमेकांविरुद्ध केलेल्या वाक्ताडनाचा ठळक गोषवारा असा:राहुल गांधी : सन २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सांगायचे की, मला पंतप्रधान नव्हे, तर देशाचा चौकीदार व्हायचे आहे. चौकीदार के सामने चोरी हुई.. तो वो चौकीदार थे या भागिदार?अमित शहा : भाजपाने काय दिले, असे वारंवार विचारता. आम्ही देशाला ‘बोलणारा’ पंतप्रधान दिला आहे. (त्यांचा रोख आधीचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे होता.)विकासाचे गुजरात मॉडेलराहुल गांधी : गुजरातचे कर्ज दोन लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. विकासाच्या नावाखाली एवढे कर्ज काढूनही शेतकरी व गरिबांची स्थिती हालाखीचीच आहे. विकासाचे हे मॉडेल अपयशी ठरले आहे.अमित शहा : ते गुजरातच्या विकासावरून टिंगल करत आहेत. पण तुमच्या तीन पिढ्यांनी अमेठीसाठी काय केले, असे मला काँग्रेसच्या ‘शहजाद्यां’ना विचारायचे आहे. तुम्ही आमच्याकडे तीन वर्षांचा हिशेब मागत आहात, पण अमेठीचे लोक तुमच्या तीन पिढ्यांचा हिशेब मागत आहेत. राहुलबाबांनी इटालियन चश्मा लावल्याने त्यांना विकास दिसत नाही!भ्रष्टाचाराविषयीराहुल गांधी : एक कंपनी (जय शहा यांची?) सहा-सात वर्षांपूर्वी स्थापन झाली. सन २०१४मध्ये ती अगदीच मामुली होती. पण त्यानंतर काही महिन्यांतच ती कंपनी एवढी मोठी झाली की तिची उलाढाल ५० हजार रुपयांवरून चक्क ८० कोटी रुपयांवर पोहोचली. त्या कंपनीस कर्ज कोणी दिले? केंद्र सरकारच्या पीयूष गोयल यांच्या खात्याने.अमित शहा : काँग्रेसने देशावर ७० वर्षे राज्य केले. मला तुम्हाला असे विचारायचे आहे की, तुम्ही येथील (अमेठीमध्ये) बराच काळ खासदार असूनही इथे जिल्हाधिकारी कार्यालय, टीबी हॉस्पिटल व आकाशवाणीचे एफएम केंद्र का नाही? गोमती नदीमुळे इथे होणारी जमिनीची धूप अजूनही का थांबलेली नाही?सुशासन आणि सरकारी कारभारराहुल गांधी : भाजपाला २२ वर्षांत जमणार नाही तेवढे काम काँग्रेस फक्त सहा महिन्यांत करून दाखवील!अमित शहा : (अमेठीवासीयांना उद्देशून) तुम्ही एकाच कुटुंबावर ६० वर्षे विश्वास ठेवलात. आता भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास ठेवा म्हणजे पश्चात्ताप करण्याची पाळी येणार नाही!
तुफानी हल्लाबोल : शहा-राहुल यांच्यात वाक्युद्ध! एकमेकांच्या बालेकिल्ल्यात शिरून घेतले तोंडसुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:46 AM