चेन्नई, दि. 21 : तामिळनाडूतील अण्णाद्रमुकचे पलानीसामी आणि पन्नीरसेल्वम हे दोन्ही गट एकत्र आले आहेत. काल अण्णा द्रमुकच्या दोन गटांचे विलीनीकरण करण्यावर सहमती झाली होती, आज त्याची फक्त औपचारिक घोषणा करण्यात आली. पन्नीरसेल्वम पक्षाचे निमंत्रक तर ई. पलानीसामी सहनिमंत्रक असतील अशी माहिती समोर आली आहे.
शशिकला आणि कुटुंबीयांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून, ओ. पन्नीरसेल्वम यांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थखात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आज दुपारी साडेचार वाजता ते मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. ओ. पनीरसेल्वम यांच्याकडे सुकाणू समितीचे अध्यक्षपद दिले जाऊ शकते. त्यामुळे त्यांच्याकडे पक्षांतर्गत अधिकार येतील. या तडजोडीनुसार, पलानीस्वामी यांच्याकडे सरकारची, तर पनीरसेल्वम यांच्याकडे पक्षाची धुरा असणार आहे.
पनीरसेल्वम यांच्या गटाने असा आग्रह केला आहे की, शशिकला यांच्या हकालपट्टीच्या प्रस्तावावर सर्व पदाधिका-यांनी स्वाक्ष-या कराव्यात. लोकसभेचे उपाध्यक्ष एम. थंबीदुराई यांनी टीटीव्ही दिनकरन यांना उपमहासचिव पदावरून हटविण्याच्या १० आॅगस्ट रोजीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली नव्हती. या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास नकार देणारे थंबीदुराई यांच्याकडे प्रचार सचिव आणि पक्षाचे खासदार नवनीत कृष्णन व विजिया सत्यानंद यांच्याकडे अनुक्रमे वकील शाखा व महिला शाखेची जबाबदारी देण्यात येईल.
या संदर्भात एक सहा सदस्यीय टीम तयार केल्यानंतर, पनीरसेल्वम यांनी शनिवारीच स्पष्ट केले होते की, आम्ही लवकरच एक चांगली बातमी देणार आहोत. अर्थात, पक्षाचे दोन पानांचे चिन्ह मिळण्यात आता टीटीव्ही दिनकरन हे कायदेशीर अडथळा आणू शकतात. 2019 च्या निवडणुकीसाठी भाजपासाठी ही जमेची बाब आहे. कारण अण्णा द्रमुकचे हे दोन गट विलीनीकरणानंतर एनडीएसोबत जाऊ शकतात. तूर्तास मुख्यमंत्रिपद मिळाले नाही, तरी पनीरसेल्वम यांची महासचिवपद मिळण्याची इच्छा आहे.