रघुनाथ पांडे , नवी दिल्लीमहाराष्ट्रात भाजपा व शिवसेनेतील जवळपास ४० - ४५ जागांची अदलाबदल होणार आहे. तशी यादीही तयार होत असून, जुलैच्या शेवटी तिला दिल्लीत अंतिम रूप येईल. या अदलाबदलीमुळे ज्यांचे मतदारसंघ बदलण्याची शक्यता आहे, त्यांनीच भाजपा स्वबळावर निवडणूक लढेल, अशी कोल्हेकुई सुरू केल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.मुंबईतील गुरुवारच्या घटनाक्रमानुसार, युतीची कोणतीच राजकीय बोलणी राज्यातील नेत्यांशी न करता थेट राष्ट्रीय अध्यक्षांशीच करण्याची पक्की मानसिकता शिवसेनेने बनविल्याचे सूत्रांनी सांगितले. तर, भाजपा पदाधिकारी बैठकीतील भावना कार्यकर्त्यांच्या आहेत; पक्षीय भूमिका नाही, असे सांगून आता हा वाद आवरण्याचा प्रयत्न माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी चालविला आहे. गेल्या काही दिवसांत भाजपा मुख्यालयात स्वबळावर निवडणूक लढण्याची मागणी करणारे अनेक दूरध्वनी येत आहेत. निवेदने देऊन काहींनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीही घेतल्या आहेत. त्यामागे दबावाचे तंत्र असले तरी, राज्यातील काही बडे नेते ही मागणी रेटून नेत आहेत.मुंबईत झालेल्या भाजपा पदाधिकारी बैठकीत राजकीय प्रस्तावावरील चर्चेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत स्वबळावर लढण्याचा आग्रह झाल्याने या बैठकीचे पडसाद राजधानीत उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील नेत्यांची एक विशेष बैठक अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात, २० जुलैच्या आधी पक्षप्रभारी राजीव प्रताप रूडी यांच्या उपस्थितीत राजधानीत घेतली जाणार आहे. कोअर टीम सदस्य, काही महत्त्वाचे खासदार व आमदारांसोबत ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले. सध्यातरी भाजपा शिवसेनेच्या पूर्ण दबावाखाली असल्याचे चित्र येथील नेत्यांच्या बोलण्यातून जाणवले.
युतीच्या ४५ जागांची अदलाबदल
By admin | Published: July 05, 2014 4:51 AM