भोपाळ : केंद्र आणि राज्यांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी दलित व मागास वर्गांनी एकत्र येण्याची गरज आहे. या वर्गांनी धार्मिक वाद आणि जातीय दंगलीपासून दूर रहायला हवे, असा सल्ला जनता दल यूनायटेडचे माजी अध्यक्ष शरद यादव यांनी दिला.शरद यादव म्हणाले की, देशातील दलित आणि मागासवर्गाने एकत्र आल्याश एक मजबूत व्होट बँक तयार करता येईल. ‘जात को जमात मे बदलो’ असे सांगत त्यांनी सर्व जाती एका मोठ्या समूहात यायला हव्यात, असे आवाहन केले. ते म्हणाले की, दलित आणि मागासवर्ग यांनी सत्तेत येण्यासाठी एकजूट होण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही मत होते.शरद यादव यांना अलीकडेच राज्यसभेतून अपात्र घोषित करण्यात आले आहे. ते म्हणाले की जातीय दंगल होत असेल तर ती रोखण्यासाठी दलितांनी व मागास वर्गांनी प्रयत्न करावेत. अडचणींच्या काळात अल्पसंख्यांकांना मदत करावी. राज्यघटनेने प्रत्येकाला मतदानाद्वारे लढण्याचे प्रभावी माध्यम दिले आहे.
साहसी व्हा : प्रकाश आंबेडकरप्रकाश आंबेडकर म्हणाले की, आपण संख्येने मजबूत आहोत. आता साहसी व्हावे लागेल. आपली लढाई भाजपशी आहे. कोरेगाव भीमाच्या घटनेचा उल्लेख करुन ते म्हणाले की, या हिंसाचारामागे असलेल्यांना अटक करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. हिंदुत्ववाद्यांना इशारा देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, धर्म व राजकारण एकत्र करु नका. अन्यथा हिंदूंमध्ये हाफिज सईदसारख्या प्रवृत्ती वाढतील. (वृत्तसंस्था)