सिकंदराबाद: रेल्वे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या चहासाठी टॉयलेटचं पाणी वापरणाऱ्या एका चहा विक्रेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर दक्षिण मध्य रेल्वेनं चहा कंत्राटदाराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. हा व्हिडीओ चेन्नई सेंट्रल-हैदराबाद चारमिनार एक्स्प्रेसमध्ये चित्रीत करण्यात आला होता. सिकंदराबाद स्थानकाजवळ एक चहा विक्रेता प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या चहा, कॉफीसाठी टॉयलेटचं पाणी वापरत असल्याचं या व्हिडीओत दिसत होतं. हा व्हिडीओ मागील वर्षी चित्रीत करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करून कंत्राटदार पी. शिवप्रसादला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी उमा शंकर कुमार यांनी दिली. व्हिडीओत दिसणारा चहा विक्रेता शिवप्रसाद यांच्याकडे काम करतो. चहासाठी टॉयलेटच्या पाण्याचा वापर करणाऱ्या चहा विक्रेत्याचा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालाय. हा व्हिडिओ गेल्या वर्षीचा असल्याची माहिती चौकशीतून समोर आलीय. या व्हिडिओमध्ये चहा विक्रेत्यासोबतच दोन फेरीवालेससुद्धा दिसत आहेत. मात्र ते अधनिकृत फेरीवाले असल्याचा दावा रेल्वेनं केलाय. 'दक्षिण मध्य रेल्वेनं अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई सुरू केलीय. गेल्या काही महिन्यांपासून सिकंदराबाद स्टेशनवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर मोठी कारवाई करण्यात आलीय. व्हिडीओत दिसणाऱ्या दोन अनधिकृत फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आलीय,' अशी माहिती रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिली. असे प्रकार टाळण्यासाठी कठोर पावलं उचलली जात असल्याचंही ते म्हणाले.
रेल्वे प्रवाशांच्या चहासाठी टॉयलेटच्या पाण्याचा वापर; कंत्राटदाराला एक लाखाचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2018 8:52 AM