नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची सुरुवात दमदार झाली आहे. पहिल्याच दिवशी भारताच्या महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं ४९ किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदकाची कमाई करुन दिली. पदकाची मानकरी होताच मीराबाईनं गेल्या पाच वर्षांपासून बाळगलेलं ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. मीराबाईच्या या यशानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत तिचं कौतुक होत आहे. तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मणीपूरचे मुख्यमंत्री ए.बीरेन सिंग यांनी मीराबाईशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत तिचं अभिनंदन व कौतुक केलं.
मीराबाईने टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत देशाला पहिलं पदक मिळवून देत भारताचं खातं उघडलं आहे. वेटलिफ्टींग प्रकारा रौप्यपदक जिंकून मीराबाईने इतिहास घडवला. माळरानावर लाकडं गोळा करुन डोक्यावर मोळी बांधणारी मीरा ते ऑलिंपिक रौप्यपदक विजेता मीराबाई चानू हा तिचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यामुळेच, गल्लीपासून दिल्लीपर्यंत तिच्या यशाचं सेलिब्रेशन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मीराबाईचं कौतुक करत अभिनंदन केलं आहे. विशेष म्हणजे मणीपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंग यांनी मीराबाईला 1 कोटी रुपयांचं बक्षीस देणार असून तिच्यासाठी सरकारी नोकरीतही स्पेशल पोस्ट देणार असल्याची घोषणा केली.
सिंग यांनी मीराबाईचं कौतुक करण्यासाठी तिच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. दोघांमधील हा संवाद त्यांनी ट्विटरवरुन शेअर केला आहे. या संवादात त्यांनी मीराबाईचं कौतुक करत, देशाला आणि मणीपूरला तुझा अभिमान असल्याचं म्हटलं. ज्यावेळी, तू मेडल जिंकलं, त्यावेळी मी देशाचे गृहमंत्री अमित शहांसोबतच बैठकीत होतो. विशेष म्हणजे गृहमंत्री शहा यांनीच या बैठकीत तात्काळ माईक पकडून ही आनंदाची घोषणा केली आणि सर्वांनी उभे राहून तुझ्या विजयाचं अभिनंदन केल्याचंही बीरेन यांनी मीराबाईला सांगितलं. माराबाई आणि बीरेन यांच्यातील आनंदाच हा संवाद सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
आयओएकडून 40 लाखांचं बक्षीस
मीराबाई चानू मूळची मणिपूरची आहे आणि येथील सरकारनं गेल्याच महिन्यात आपल्या राज्यातील पदक विजेत्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या पारितोषिकाची घोषणा केली होती. राज्यांसोबतच भारतीय ऑलिम्पिक संघानंही (आयओए) पदक विजेत्या खेळाडूंसाठी पारितोषिकं जाहीर केली आहेत. आयओएकडून केल्या गेलेल्या घोषणेनुसार सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना ७५ लाख, रौप्य पदक विजेत्या खेळाडूंना ४० लाख आणि कांस्य पदक विजेत्या खळाडूंना २५ लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. त्यानुसार मीराबाई चानू हिला आयओएकडून ४० लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे.
राज्य सरकारकडून 1 कोटीचं बक्षीस
मणिपूर सरकारनं आपल्या राज्यातील पदक विजेत्या खेळाडूंना देखील पारितोषिकाची घोषणा केली होती. त्यानुसार सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला १.२० कोटी आणि रौप्य पदक विजेत्या खेळाडूंना १ कोटी रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. त्यानुसार मीराबाई चानू हिला मणिपूर सरकारकडून १ कोटी रुपायांचं पारितोषिक मिळणार आहे. म्हणजेच ऑलिम्पिकच्या रौप्य पदकासह मीराबाई चानू हिला आता एकूण १ कोटी ४० लाख रुपायंचं पारितोषिक देखील मिळणार आहे. यासोबत इतर काही विभागातूनही मीराबाई हिला पारितोषिकांची घोषणा केली जाऊ शकते.