लखनऊ- आई-वडिलांनी शिक्षण सोडून मुलीला नोकरी करायला सांगितली म्हणून तीन बहिणींनी घर सोडल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. 16 व 14 वर्षीय दोन सख्ख्या बहिणी व त्यांच्या 13 वर्षाच्या चुलत बहिणीने घर सोडलं. शिक्षण सोडून घरखर्चाला हातभार लावण्यासाठी नोकरी कर, असं 16 वर्षाच्या मुलीला तिच्या पालकांनी सांगितलं. त्यामुळे तिने घर सोडण्याचं ठरवलं. त्या तिघींनी तणावात घर सोडल्यानंतर सितापूर, लखिमपूर आणि शहाँजहाँपूर असा प्रवासही केला. दरम्यान, पोलिसांनी या तिघींना बुधवारी ताब्यात घेतलं.
मुलींचं कुटुंब इंदिरानगरमधील सेक्टर 9 इथल्या झोपडपट्टीत राहतात. या कुटुंबातील मोठी मुलगी दहावीत शिकते. तिलाच तिच्या पालकांनी शिक्षण सोडायला सांगितलं होतं. पण मुलीला पुढे शिकण्याची इच्छा होती. म्हणून तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला.
'मुलीचं तिच्या लहान व चुलत बहिणीशी चांगलं जमायचं. त्यामुळे जेव्हा तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हाच तिच्या दोन्ही बहिणींनीही घर सोडण्याचं ठरवलं. 23 एप्रिल रोजी त्यांनी सायकल घेऊन घर सोडलं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दुसऱ्या दिवशी मुलींच्या पालकानांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मुलीला घरकामं करून पैसे कमावण्याचं सांगितलं होतं, असं पालकांनी तक्रारीमध्ये नमूद केलं आहे. 23 तारखेला घरातून निघालेल्या मुली दुसऱ्या दिवशी सितापूरमध्ये पोहचल्या. पैसे कमी असल्याने त्यांनी सितापूरमध्ये सायकल विकली. नंतर त्यांनी ट्रेनने शहाँजहाँपूरपर्यंत ट्रेनने प्रवास केला. तेथून लखिमपूर आणि लखनऊ त्यांनी ट्रेनने प्रवास केला. लखनऊनंतर त्या सिदौलीसाठी निघाल्या कैसरबाग बस स्थानकावर पोहचल्यावर त्या पोलिसांना सापडला.
दरम्यान, मुलींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना घरी पाठविण्यात आलं आहे. तसंच यापुढे जास्त मेहनत करून मुलींना शिकू देणार आहे, त्यांना शिक्षण सोडावं लागणार नाही, असं मुलीच्या वडिलांनी म्हटलं.