नवी दिल्ली - चोरीच्या घटना या सातत्याने समोर येत असतात. मात्र जर कोणी पूल चोरीला गेल्याचं सांगितलं तर ते नक्कीच खोटं वाटेल. पण हो हे खरं आहे. दिल्लीमध्ये चोरीची अशीच एक अजब घटना समोर आली आहे. दिल्लीमध्ये लोकांना रस्ता सुरक्षितरित्या पार करता यावा यासाठी पादचारी पूल बांधण्यात आले आहेत. मात्र यातील एक पूल हा चोरीला गेल्याची अजब घटना समोर आली आहे. या घटनेनंतर सर्वच जण चक्रावून गेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या जवळ असलेल्या एका गर्दीच्या रस्त्यावर सप्टेंबर 2010 मध्ये असाच एक पादचारी पूल उभारण्यात आला होता. पूल बांधल्यानंतर मात्र काही महिन्यातच या पुलाचा एक एक भाग चोरीला जाऊ लागला. काहींनी एलिव्हेटरचे स्वीच चोरून नेले. तर काही लोकांनी रेलिंग आणि पुलाच्या विटाही लंपास केल्या आहेत. सर्व भाग चोरून नेल्याने पुलाचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला होता. त्यामुळे हा पूल गेल्या दोन वर्षांपासून बंद होता. मात्र आता काही दिवसांपूर्वी या पुलाची शेवटची रेलिंगही चोरीला गेली आहे.
दिल्लीतील हा पादचारी पूल उभारण्यासाठी आठ वर्षांपूर्वी जवळपास 4 कोटी रुपये खर्च आला होता. तसेच आठवडाभरात 10 हजार लोक त्याचा वापर करत असे. मात्र आता पूल चोरीला गेल्याने काय करायचं असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. हा पादचारी पूल बंद झाल्यानंतर या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पोलिसांनी पादचारी पूल चोरीला गेल्याची कोणतीही तक्रार आमच्याकडे आली नसल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतणीची पर्स हिसकावून चोरटे पसार झाल्याची घटना समोर आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावाची मुलगी दमयंती बेन मोदी अमृतसरहून दिल्लीला आल्या होत्या त्यावेळी त्यांची पर्स चोरीला गेली. चोरीच्या घटनांमुळे दिल्लीतील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमधील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरी देखील काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. जैन यांच्या स्वयंपाक घरातील आणि बाथरुममधील नळ तसेच शोभेच्या वस्तूही चोरांनी लंपास केल्या. सत्येंद्र यांनी रविवारी (22 सप्टेंबर) ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. आरोग्यमंत्री जैन यांनी चोरीच्या घटनेनंतर आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट केलं होतं. यामध्ये दिल्लीतील सरस्वती विहार परिसरात असणाऱ्या त्यांच्या घराचे काही फोटो पोस्ट केले होते. या फोटोमध्ये घरातील सामान अस्थावस्थ पडलेले दिसले. दिल्लीतील चोरांना पोलिसांची भीती राहिलेली नाही असं ही त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं होतं.