मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० एप्रिलपासून देशातील काही राज्यांमध्ये, काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, देशभरात २० एप्रिलपासून लॉकडाऊनमध्ये काही बदल करण्यात आले आहे. त्यानुसार, शेतीसंदर्भातील आणि काही उद्योग सुरू करण्यात येत आहेत. त्यातच, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने २० एप्रिलच्या मध्यरात्रीपासूनच टोलवसुलीला सुरुवात केली आहे. राज्यातील वाशीजवळील महामार्गावरही मध्यरात्रीपासूनच टोलवसुली सुरु झाली आहे. दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक टोलनाक्यांवर रात्रीच वाहनांकडून टोलवुसली करण्यात आली.
राज्यातील सर्व टोलनाक्यावर टोलवसुली सुरू करण्यात येणार असल्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या सचिवांनी जारी केले आहेत. त्यानुसार, राज्यभरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाच्या अधिपत्याखालील सर्व टोलनाक्यांवर टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. तसेच, रस्ते आणि महामार्ग विकास प्राधिकरणाच्या आदेशानुसार देशभरात टोलवसुली सुरु झाली असून २० एप्रिलच्या मध्यरात्रीपासूनच वाहनांकडून टोलवसुली करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, सध्या केवळ अत्यावश्यक सेवांची वाहतूक होत आहे, त्याच वाहनांना आंतरजिल्हा, आंतरराज्य सीमांमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. याशिवाय, पोलीस परवानगीने अत्यावश्यक आणि अतिदक्षता व महत्वाच्या प्रसंगीच सर्वसामान्य नागरिकांना वाहतूकीचा परवानगी देण्यात आली आहे.
सरकारने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन दरम्यान २९ मार्चपासून टोलवसुली थांबवली होती. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंची ने-आण करणे सोपे झाले होते. लॉकडाउनच्या काळात सर्व सेवा बंद होत्या. मात्र, आता देशभरात कोरोना हॉटस्पॉट नसलेल्या ठिकाणी २० एप्रिलपासून सवलत देण्यात येत आहे. तसेच काही भागात काही अटी लागू करून उद्योगधंद्यांना परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आणि खासगी वाहने रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच, २० एप्रिलपासून सर्वांना प्रवास करताना टोल सुरू करण्यात आला आहे.