नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने ‘एनएचएआय’ला (नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया) लोकसभा निवडणुकीनंतर महामार्गांवर नवीन टोल दर लागू करण्यास सांगितले आहे. साधारणत: टोलनाक्यांवरील दर १ एप्रिलपासून वाढवले जातात, मात्र नवे दर निवडणुकीनंतरच लागू करावेत, असे आयोगाने म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने ‘एनएचएआय’ला टोल दरवाढ पुढे ढकलण्यास सांगितले आहे. या संदर्भात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्र्यांच्या पत्राला उत्तर देताना निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. टोल शुल्कात सरासरी पाच टक्क्यांनी वाढ होईल, असे मानले जात होते. एनएचएआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीच्या बदलानुसार टोल शुल्क दरवर्षी बदलले जाते. देशातील १८ व्या लोकसभेच्या निवडणुका १९ एप्रिलपासून सुरू होणार असून १ जूनपर्यंत चालणार आहेत. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.