- नितीन अग्रवाललोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझा काढून टाकण्याची तयारी सरकारने केली आहे. टोल प्लाझाऐवजी स्वचलित व्यवस्था लागू करण्याची तयारी सुरू असून, फास्टॅगद्वारे आपोआप टोल वसूल केला जाईल.
नितीन गडकरी यांच्या रस्ते परिवहन मंत्रालयातील सूत्रांनुसार या नव्या व्यवस्थेत जेवढ्या रस्त्याचा वापर केला जाईल तेवढाच टोल वसूल केला जाईल. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) निर्देशही दिले गेले आहेत.
टोलविरहित व्यवस्थेच्या माहीतगारांनुसार टोल असलेल्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी खास अँटेना तथा अत्याधुनिक कॅमेरे लावले जातील. ते फास्टॅगच्या सिग्नलच्या मदतीने तेथून जाणाऱ्या वाहनाची ओळख निश्चित करतील आणि ती माहिती सर्व्हरवर पाठवतील. त्यामुळे टोलची रक्कम फास्टॅगने कापून घेतली जाईल. टोल प्लाझाच्या तुलनेत या नव्या प्रणालीची देखरेख कमी खर्चाची असेल. टोल प्लाझामुळे वाहतूक कोंडी होणार नाही व राष्ट्रीय महामार्गांचा वेग वाढून वाहतूक कोंडीमुळे खर्च होणारा वेळ व दरवर्षी लाखो लिटर इंधनही वाचेल. नवी व्यवस्था पर्यावरणस्नेही असेल.
८० टक्के वसुली होत आहे फास्टॅगद्वारेच...एक जानेवारीपासून नव्या व जुन्या वाहनांसाठी फास्टॅग लागू झाला आहे. आधी टोल रोखीने घेण्याऐवजी फास्टॅग व्यवस्था लागू होईल व नंतर राष्ट्रीय महामार्गांवरील सगळे टोल प्लाझा टप्प्याटप्प्याने काढून टाकले जातील. त्यासोबत राष्ट्रीय महामार्गांसाठी निविदांतूनही टोल प्लाझा बनविणे काढून टाकले जाईल. सध्या तीन कोटींपेक्षा जास्त वाहनांना फास्टॅग लावून झाला आहे आणि ८० टक्के वसुली फास्टॅगद्वारेच होत आहे. फक्त डिसेंबर महिन्यात फास्टॅगच्या माध्यमातून १.३५ कोटी रुपयांची वसुली झाली.