गेल्यावर्षी टोमॅटोने सामान्यांचा खिसा रिकामा तर शेतकऱ्यांचा खिसा गरम केला होता. टोमॅटोचे दर २०० पार गेल्याने अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड करण्यास सुरुवात केली होती. यामुळे हा दर पुन्हा काही महिन्यांत खाली आला होता. आता पुन्हा तशी परिस्थिती असून यंदाही टोमॅटो खिसा रिकामा करण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अनेक भागात क़डक उन्हाळा, पाणी टंचाई आणि आता अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे पुराचे संकट आले आहे. याचा परिणाम भाज्यांच्या पुरवठ्यावर झाला असून टोमॅटोसह अन्य भाज्याही महाग होऊ लागल्या आहेत. देशातील काही भागातील टोमॅटोचे वाढलेले दर पाहिले तर अनेकांना गेल्या वर्षीची आठवण होणार आहे.
उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये टोमॅटोची किंमत १६२ रुपये किलो झाली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोलकात्यामध्ये टोमॅटो १५२ रुपये प्रति किलो, दिल्लीत १२० रुपये, चेन्नईत ११७ रुपये आणि मुंबईत १०८ रुपये प्रति किलोचा दर आहे. बटाट्याचा दरही ३५ ते ४० रुपयांच्या आसपास असून कांदा देखील ४५ ते ५० रुपये किलो झाला आहे.
३ जुलैरोजी टोमॅटोचा दर हा सरासरी ५५.०४ रुपये किलो होता. गेल्या महिन्यात ३ जूनला हाच टोमॅटो ३४.७३ रुपये किलो होता. गेल्या वर्षी ३ जुलै रोजी हाच दर 67.57 रुपये किलो होता. तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात टॉमेटो २५० रुपयांवर जाऊन पोहोचला होता. ज्या शेतकऱ्यांनी या काळात टोमॅटोचे पिक घेतले त्यांनी काही कोटींमध्ये उत्पन मिळविले होते.