लखनऊ : टोमॅटोच्या चढ्या भावांमुळे सर्वसामान्यांच्या ताटातून ते गायब होत असताना, या प्रकाराचा निषेध करण्यासाठी उत्तर प्रदेशकाँग्रेसने सोमवारी टोमॅटो राखी विकायला आणली होती. दोऱ्याला टोमॅटो बांधून ही राखी तयार करण्यात आली होती.प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शैलेंद्र तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली या टोमॅटो राखीची संकल्पना राबविण्यात आली. लखनऊच्या कुर्सी रोडवरील गुलाचीन मंदिराच्या बाजूला असलेल्या अनेक दुकानांमध्ये या अनोख्या टोमॅटो राख्या विक्रीला ठेवण्यात आल्या होत्या. भावाला ही अनोखी राखी बांधा, असा प्रचार काँग्रेसचे कार्यकर्ते तिथे करताना दिसत होते. यासाठी लोकांनीही गर्दी केली होती.टोमॅटोच्या दरांबद्दल राज्य आणि केंद्र सरकार पूर्णपणे उदासीन आहे. त्याचाच निषेध करण्यासाठी आम्ही हे टोमॅटो राखी आंदोलन सुरू केले आहे, असे शैलेंद्र तिवारी यांनी सांगितले. याआधी लखनऊ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टोमॅटो बँक सुरू केली होती आणि विधान भवनाच्या बाहेर १0 रुपये किलो या दराने टोमॅटो विकले होते. (वृत्तसंस्था)स्टेट बँक आॅफ टोमॅटो; अर्धा किलो जमा करा, एक किलो मिळवा!लखनऊमध्ये काँग्रेसने सुरू केलेल्या ‘स्टेट बँक आॅफ टोमॅटो’मध्ये ग्राहकांना टोमॅटोंचे फिक्स डिपॉझिट व टोमॅटोसाठी लॉकर सेवा सुरू करण्यात आली होती. एवढेच नव्हे, तर टोमॅटोवर कर्जही देण्यात येत होते.बँकेच्या बाहेर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. अर्धा किलो टोमॅटो बँकेत डिपॉझिट केल्यास काढताना एक किलो मिळतील, असे जाहीरच करण्यात आले होते. टोमॅटो बँकेत डिपॉझिट करावे लागण्याची वेळ येईल, असे कधीही वाटले नव्हते, असे तेथील ग्राहकांनी बोलून दाखवले.
काँग्रेसचे लखनऊ मध्ये टोमॅटो राखी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 1:34 AM