गेल्या महिनाभरापासून टोमॅटोचे दर कमालीचे वाढलेले आहेत. देशातील बहुतांश भागात टोमॅटो १५० ते २०० रुपये किलो दराने विकले जात आहेत. टोमॅटो प्रचंड महाग झाल्याने दैनंदिन स्वयंपाकामधूनही त्याचं प्रमाण कमी झालं आहे. काही जणांनी खर्च टाळण्यासाठी टोमॅटो खरेदी करणं बंद केलं आहे. काही ठिकाणी सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार टोमॅटो ७० रुपये प्रति किलो दराने देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, सर्वसामान्यांना दिलासादायक बाब म्हणजे लवकरच टोमॅटोचे दर ३० रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्यानंतर टोमॅटोच्या दरांमध्ये घसरण सुरू झाली आहे. तसेच ऑगस्टच्या मध्यापर्यंत ही घसरण कायम राहण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या काळात टोमॅटोच्या किमतींमध्ये घसरण कायम राहण्याची चिन्हे आहेत. तसेच या किमती ऑगस्टच्या मध्यापर्यंत स्थिरावू शकतात. टोमॅटोचे दर ऑगस्टच्या मध्यापर्यंत ३० रुपये प्रतिकिलो होऊ शकतात. तसेच यादरम्यान किमती स्थिरावू शकतात.
एनएचआरडीएफचे संचालक पी. के. गुप्ता यांनी सांगितले की, टोमॅटोच्या किमती सामान्य पातळीवर येण्यापूर्वी पुढच्या १० दिवसांमध्ये प्रतिकिलो टोमॅटोची किंमत ही ५० किलोग्रॅमपर्यंत कमी होऊ शकते. गुप्ता यांनी ऑफ सिझनमधील मागणी पूर्ण करण्यासाठी टोमॅटो प्युरीचा वापर लोकप्रिय करण्यासाठी एका दीर्घकालिन योजनेचा सल्ला दिला. त्याचं कारण म्हणजे टोमॅटोची रेफ्रिजरेटरमधील शेल्फ-लाइफ कमाल २० दिवस आहे. तसेच नियंत्रित वातावरण (सीए) कोल्ड स्टोरेजचा वापर करणं आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणार नाही.
साधारणपणे जुलै आणि ऑगस्ट महिन्यांमध्ये टोमॅटोच्या किमती वाढतात. कमी उत्पादन आणि पावसामुळे सप्लाय चेनमध्ये येणारा अडथळा ही त्यामागची कारणं असल्याचं सांगितलं जातं. यावर्षीही अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पाऊस पडत असल्याने आणि पूरस्थिती निर्माण झाल्याने टोमॅटोची सप्लाय कमी झाली आहे.