नवी दिल्ली, दि. 2 - पीएसएलव्ही-सी39 हा भारताचा भरवशाचा प्रक्षेपक आहे. पण गुरुवारी हाच प्रक्षेपक आयआरएनएसएस 1 एच या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात अपयशी ठरल्याने भारताच्या अवकाश कार्यक्रमाला मोठा धक्का बसला. हे उपग्रह प्रक्षेपण का फसले ? त्यामागे नेमकी काय कारणे आहेत याचा शोध सुरु केल्यानंतर एक टन अतिरिक्त वजनामुळे हे प्रक्षेपण फसल्याचे समोर आले आहे.
दोन टप्पे पूर्ण केल्यानंतर पीएसएलव्ही-सी39 ला तिसरा टप्पा पूर्ण करता आला नाही. पीएसएलव्ही-सी39 जी क्षमता आहे त्यापेक्षा एक टन अतिरिक्त वजन प्रक्षेपकामध्ये होते. त्यामुळे तिस-या टप्प्यात हिट शील्ड वेगळी झाली नाही. ज्याचा परिणाम गतीवर झाला. उदहारणार्थ अंतिम टप्प्यात प्रतिसेकंद 9.5 किलोमीटरची गती हवी होती. पण ती 8.5 किलोमीटर राहिली असे इस्त्रोच्या उपग्रह केंद्राचे माजी संचालक एस.के. शिवाकुमार यांनी सांगितले. उड्डाणाच्यावेळी प्रक्षेपकामध्ये जी उष्णता तयार होते. त्यापासून उपग्रहाचे संरक्षण करण्यासाठी हीट शील्ड असते. आयआरएनएसएस 1 एच हा आयआरएनएसएस मालिकेतील आठवा उपग्रह होता. यापूर्वी या मालिकेतील सात उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे.
आयआरएनएसएस 1 एच च्या निमित्ताने प्रथमच उपग्रह निर्मितीमध्ये खासगी क्षेत्राला यामध्ये सहभागी करुन घेण्यात आले होते. हा 1425 किलो वजनाचा उपग्रह होता. या उपग्रहाच्या निर्मितीवर 120 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. आयआरएनएसएस 1 एच च्या निमित्ताने 24 वर्षात पहिल्यांदाच पीएसएलव्हीचे उड्डाण अपयशी ठरले.
लवकरच इस्त्रो रॉकेलला इंधन बनवून करणार उपग्रहाचे प्रक्षेपण
भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रो सेमी क्रायोजेनिक इंजिनच्या निर्मितीवर काम करत असून, या इंजिनमध्ये पर्यावरणपूरक रॉकेलचा इंधन म्हणून वापर करण्यावर शास्त्रज्ञ काम करत आहेत. द्रवरुप इंधनापेक्षा रॉकेल हलके असल्यामुळे सामान्य तापमानाला ते साठवून ठेवता येऊ शकते. सध्या उपग्रह प्रक्षेपणासाठी वापरल्या जाणा-या रॉकेटच्या इंजिनमध्ये द्रवरुप हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या मिश्रणाचा इंधन म्हणून वापर केला जातो.
हे इंधन गोठवून टाकणा-या (-253) डीग्री सेल्सिअस तापमानाला साठवून ठेवावे लागते. जर सर्व काही ठरल्याप्रमाणे जुळून आले तर, इस्त्रो 2021 मध्ये रॉकेलच्या सहाय्याने सेमी क्रायोजेनिक इंजिनची चाचणी करु शकते. पारंपारिक हायड्रोजन, ऑक्सिजन इंधनापेक्षा रॉकेल हलके आहे. क्रायोजेनिक इंजिनाच्या वापरामुळे रॉकेटमधील पेलोडची क्षमता चार ते सहा टनांनी वाढेल. सेमी क्रायोजेनिक इंजिन असलेल्या रॉकेटने अवजड उपग्रह प्रक्षेपित करता येऊ शकतात.