नवी दिल्ली - लष्करी मोहिमांचं राजकारण करणे योग्य नाही, असे मत लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी.एस.हुड्डा यांनी व्यक्त केले. शिवाय, सर्जिकल स्ट्राइकचा मोठ्या प्रमाणात गवगवा करण्यात आल्या प्रकरणीही त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. सप्टेंबर 2016मध्ये भारतीय लष्करानं नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरात सर्जिकल स्ट्राइकची कारवाई केली. उरी दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत दहशतवाद्यांचे तळ भारतीय लष्करानं उद्धवस्त केले. या कारवाईच्या वेळेस डी.एस.हुड्डा उत्तरी सैन्य विभागाचे कमांडर होते.
याबाबत बोलताना ते म्हणाले की, 'सर्जिकल स्ट्राईक कारवाईचा एवढा गवगवा करण्याची आवश्यकता नव्हती'. 'रोल ऑफ क्रॉस-बॉर्डर ऑपरेशन्स अँड सर्जिकल स्ट्राइक' या विषयावर संबोधित करत असताना त्यांनी आपलं परखड मत यावेळेस व्यक्त केले.
हुड्डा पुढे असंही म्हणाले की, एका लष्करी मोहिमेचा व्हिडीओ आणि फोटो लीक करुन या विषयाला राजकीय रंग देण्यात आला. जर तुम्ही लष्करी मोहिमेचं राजकारण करू इच्छिता तर हे योग्य नाही.
(सर्जिकल स्ट्राईकमुळे भारतीयांची मान स्वाभिमानाने ताठ झाली : नितीन गडकरी)