श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये रविवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. रात्रभर सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांच्या हाती मोठं यश लागलं आहे. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यात लष्कर-ए-तोयबाचा टॉप दहशतवादी असलेल्या मुदासिर पंडितचादेखील समावेश आहे. सध्याच्या घडीला परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.
तीन पोलीस कर्मचारी, दोन नगरसेवक आणि दोन नागरिकांच्या हत्येत सहभाग असलेला लष्कर-ए-तोयबाचा टॉप दहशतवादी मुदासिर पंडित सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत मारला गेल्याची माहिती काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी दिली. या कारवाईत लष्कर-ए-तोयबाचे एकूण ३ दहशतवादी मारले गेले. आता सुरक्षा दलांकडून परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर काश्मीरच्या बारामुला जिल्ह्याच्या सोपोरमध्ये गुंड ब्रथ परिसरात रविवारी रात्री उशिरा दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला. यानंतर घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिलं. रात्री अनेक तास सुरू असलेल्या या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आलं.