श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान लष्कर-ए-तोयबाच्या एका टॉप दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. आसिफ असं खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव असून तो लष्कर-ए-तोयबाचा टॉप रँकचा दहशतवादी असल्याची माहिती मिळत आहे. या परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सोपोरमध्ये चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी लष्कर-ए-तोयबाच्या एका टॉप दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. या चकमकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. खात्मा करण्यात आलेल्या आसिफने काही दिवसांपूर्वी सोपोरमध्ये गोळीबार केला होता. त्यामध्ये अडीच वर्षाच्या बालिकेसह एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले होते. तसेच काश्मीरमधील नागरिकांना धमकाविणारी भित्तीपत्रके लावल्याप्रकरणी बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागातून लष्कर-ए-तोयबाच्या (एलईटी) आठ दहशतवाद्यांना मंगळवारी सुरक्षा दलांनी अटक केली आहे.
मोहरमनिमित्त नागरिकांनी मिरवणुका काढून त्यातून अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी मंगळवारी श्रीनगर व काश्मीरच्या काही भागांत निर्बंध पुन्हा लागू करण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मिरी नागरिकांनी हरताळ पाळण्याचे आवाहन सोपोर व परिसरात लावण्यात आलेल्या भित्तीपत्रकांमध्ये करण्यात आले होते, तसे न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागण्याचा इशाराही दहशतवाद्यांनी दिला होता. सोपोरमध्ये गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अडीच वर्षे वयाच्या बालिकेसह एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले होते. त्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसरात अधिक कडक बंदोबस्त ठेवला आहे.
बाजारपेठा बंदच
370 कलम रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेले निर्बंध त्या-त्या परिसरातील स्थितीनुसार शिथिल करण्यात किंवा पुन्हा लागू करण्यात येत आहेत. काश्मीरमध्ये खासगी वाहनांची वाहतूक सुरू झाली असली तरी सार्वजनिक वाहतूक सेवा व बाजारपेठा पूर्णपणे बंद आहेत. अनेक भागांत बंदसदृश वातावरण आहे. सरकारी शाळा, कार्यालये उघडली असली तरी तिथे कमी उपस्थिती असते. खासगी शाळा बंद आहेत. मुलांच्या सुरक्षेच्या काळजीमुळे त्यांना शाळेत पाठविण्यास पालक तयार नाहीत.